'पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांविरुद्ध राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करा' - Antop Hill Police station
संकटमय परिस्थितीत जर पोलिसांवर कोणी हल्ले करत असतील तर त्यांच्यावर तत्काळ राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
मुंबई -कोरोनोच्या संकटात पोलीस यंत्रणा दिवस-रात्र कोविड योद्धे म्हणून लढत आहे. राज्याला कोरोनाच्या संकटातून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा संकटमय परिस्थितीत जर पोलिसांवर कोणी हल्ले करत असतील तर त्यांच्यावर तत्काळ राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
अँन्टॉप हिल पोलीस ठाण्याच्या पोलिसांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आज प्रविण दरेकर यांच्यासह भाजप मुंबईचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार तमिल सेल्वन, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर आदींनी सहाय्यक पोलीस आयुक्त भारत भोईटे व अँन्टॉप हिल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रशांतराजे यांची भेट घेतली. पोलिसांवर हल्ले करणाऱ्या प्रवृत्तींविरुध्द राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करुन त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन यावेळी त्यांना देण्यात आले.
सध्या कोरोनोसारख्या संकटमय परिस्थितीचे आव्हान सर्वांसमोर आहे. असे हल्ले होत राहिले तर कोरोनोची स्थिती नियंत्रणात आणणे कठिण होईल असेही दरेकर म्हणाले. सरकार ही परिस्थिती हाताळण्यात कमी पडत आहे. त्यामुळे यापुढे महाराष्ट्रातील एकाही पोलिसांच्या केसाला धक्का लागणार नाही याची हमी सरकारने आम्हाला द्यावी, अन्यथा आताच आम्ही या पोलीस ठाण्यासमोर उपोषणाला बसू असा सक्त इशारा दरेकर यांनी दिला. त्यामुळे अँन्टॉप हिल पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांमार्फत तातडीने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संर्पक साधण्यात आला. त्यानंतर गृहमंत्री देशमुख यांनी दोन वेळा दरेकर यांच्याशी संर्पक साधला. यापुढे पोलिसांवर हल्ले होणार नाहीत. हल्ले रोखण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक तातडीने तयार करण्यात येईल. त्यांच्या संरक्षणाची पूर्ण काळजी सरकार घेईल, असे आश्वासन गृहमंत्री देशमुख यांनी दरेकर यांना दिले. गृहमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अखेर दरेकर व भाजपचे शिष्टमंडळ पोलीस ठाण्यासमोर उपोषणाला बसले नाहीत.
दरेकर यांनी सांगितले, की महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यांमध्ये जवळ जवळ २२५ पोलिसांवर हल्ले झाले. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि राज्य सरकारचे समाज कटंकाविरुध्दचे नियंत्रण सुटल्यामुळे अशा प्रवृत्ती रोज पोलिसांवर हात उचलण्याचे धाडस करत आहेत. अँटॉप हिल पोलिस ठाण्याच्या पोलिसांवर काल झालेला हल्ला हा अतिशय दुर्दैवी आहे. अशा प्रकारे जर पोलिसांवर हल्ले होत असतील तर पोलिसांचा धाक व दरारा संपून अराजकता माजेल अशी चिंता त्यांनी यावेळी व्यक्त केली.
महाराष्ट्रात कोरोनोची परिस्थितीत नियंत्रणात आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे राज्य सरकारने हा विषय प्रतिष्ठेचा न करता थेट केंद्र सरकारला मध्यस्थीची विनंती करावी. कारण मुंबईसह राज्यामध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लोकांचा जीव वाचविण्यासाठी आता राज्य सरकारने केंद्र सरकारला विनंती करावी. त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शक सूचना घेऊन कृती आराखडा तयार करावा, अशी सूचनाही दरेकर यांनी यावेळी दिला.
राज्य सरकारने केवळ क्वारंटाईन सेंटर वाढवून तसेच १ हजार, दीड हजार बेडची व्यवस्था करुन चालणार नाही. तर त्यापूर्वीच नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने गतीने प्रयत्न केले पाहिजेत असेही दरेकर म्हणाले.