मुंबई:खारघर येथील घटना ही मानवनिर्मित आपत्ती असल्याने राज्य शासन सत्य परिस्थिती दडविण्याचा प्रयत्न करीत आहे. ही घटना महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणारी आहे. त्यामुळे या घटनेची सत्य परिस्थिती जनतेसमोर येणे आवश्यक आहे. तसेच, भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी या प्रकरणाची आपण उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषींविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्याचे निर्देश शासनास द्यावेत, अशा मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने राज्यपालांना दिले.
काय होते शिष्टमंळाचे म्हणणे?खारघर येथे ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना 16 एप्रिल, 2023 रोजी 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या कार्यक्रमात उष्माघात व चेंगराचेंगरीमुळे १४ श्रीसेवकांचा नाहक जीव गेला; मात्र शासनाने या दुर्दैवी घटनेनंतर कोणतीही भूमिका अथवा प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. शासनाने जारी केलेल्या आकड्यांबाबत आजही संभ्रम कायम आहे. आश्चर्य म्हणजे एक आठवड्यानंतरही स्थानिक पोलीस ठाण्यात या घटनेबाबत अपमृत्यूची नोंद झालेली नाही. 'महाराष्ट्र भूषण' कार्यक्रमाला १४ कोटी रुपये खर्च करण्यात आले; परंतु कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. घटनेला जबाबदार ठरलेल्या व नियोजनात निष्काळजीपणा करणाऱ्या स्थानिक वरिष्ठ पोलिसांवरही किमान कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी देखील राज्यपालांकडे केल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी दिली. याबाबत राज्य शासनासोबत बोलून आजच पावले उचलण्याचे आश्वासन राज्यपालांनी दिल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.