मुंबई -महाराष्ट्र सरकारला 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याची घोषणा महाराष्ट्र भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी याबाबत घोषणा केली. रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत दमण येथील फार्मा कंपनीत दरेकर आणि लाड दाखल झाले होते.
रेमडेसिवीर इंजेक्शनवर निर्यातबंदी
देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मागील अनेक दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. या पार्श्वभूमीवर देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला असून दुसरीकडे रुग्ण वाढत असल्यामुळे औषधांचा तुटवडासुद्धा जाणवतो आहे. कोरोनावरील उपचारासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा भासू लागला आहे. औषधांची अशीच वाणवा राहिली तर आगामी काही दिवसांत परिस्थिती गंभीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशात तयार होणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. जोपर्यंत देशातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नाही तोपर्यंत इंजेक्शन देशाबाहेर न पाठवण्याचे केंद्र सरकाने रेमडेसिवीर तयार करणाऱ्या कंपन्यांना निर्देश दिले आहेत.