मुंबई : मानवी हक्कांचे संरक्षण, प्रसार करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना केली. लोकसेवकांकडून नागरिकांच्या मानवी हक्कांच्या होणाऱ्या उल्लंघनावर लक्ष ठेवून कार्यवाही करणे, कारागृहात कैद्यांच्या राहणीमानाच्या परिस्थितीचा अभ्यास, त्यांचे संरक्षण, उपचार, मानवी हक्काच्या संरक्षणासाठी सुरक्षात्मक उपाय, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कराराची प्रभावी अंमलबजावणीचे काम आयोगावर सोपवण्यात आले. (२००१)मध्ये या कामासाठी विविध (५४)पदे निर्माण केली. आजच्या घडीला केवळ २६ पदे कार्यरत असून २८ पदे रिक्त आहेत. रिक्त पदाचा परिणाम कामकाजावर होत आहेत.
२० हजार प्रकरण न्यायप्रविष्ट :राज्य मानवी हक्क आयोगात येणाऱ्या तक्रारींची संख्या दिवसागणिक वाढत आहे. (२०१४)नंतर हे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. परंतु, तक्रारींचा निपटारा होण्याची गती मंदावली आहे. आयोगाकडे (१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२०)पर्यंत २१ हजार ७२० प्रकरण निकालासाठी आली. कर्मचारी वर्गाचा अभावामुळे याच काळात २० हजार ७७३ प्रकरण न्यायप्रविष्ट आहेत. आजवर केवळ १५१ याचिकाकर्त्यांची प्रकरणे निकाली निघाली आहेत. उर्वरित प्रकरण शासन दरबारी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. आयोगात विविध रिक्त पदांची संख्या मोठी असून, अशी प्रकरणे हाताळताना अनेक अडचणी येत आहेत. २० हजार ७३७ प्रकरणात १८ हजार ५७ इतकी प्रकरणे जुनी आहेत. या वर्षात ३ हजार ७६३ इतकी नव्या प्रकरणाची भर पडली आहे.
दाद मागायची कोणाकडे? :राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे २०१८ ते २२ या काळात ४ हजार ६०० तक्रारी आल्या. या पैकी २ हजार ३२३ प्रकरण निकाली काढण्यात आली. उर्वरित २ हजार २७७ प्रकरण प्रलंबित आहेत. विशेषतः २०२० मध्ये १ हजार ४५० तक्रारी आल्या असून, मागील पाच वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण ३१ टक्के इतके आहे. आयोगाकडे दिवसागणिक प्रकरण वाढत असली तरी शासनाकडून कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत. सर्व सामन्यांनी न्याय मागायचा कोणाकडे असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
कारागृहात मानवी हक्काच्या उल्लंघन :राज्य मानवी हक्क आयोगाकडे कारागृहातील कैद्यांच्या संरक्षणाबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. ३१ जानेवारी २०२३ पर्यंत मध्यवर्ती कारागृह, विशेष कारागृह, जिल्हा कारागृह, किशोर सुधारगृह, महिला कारागृह, खुले कारागृह आणि इतर कारागृह आहेत. या कार्यालयात एकंदरीत २४ हजार ७२२ इतके कैद्यांना कैद करायची क्षमता आहे. आतापर्यंत ४१ हजार ७५ कैदी या कारागृहात असून, सुमारे १६६ टक्के म्हणजेच १६ हजार ३५३ अतिरिक्त कैदी बंदिस्त आहेत. मध्यवर्ती कारागृहात १५ हजार ५०६ ची क्षमता असताना २८ हजार ५४० कैद्याना ठेवण्यात आले आहे. तर जिल्हा कारागृह, महिला कारागृह, विशेष कारागृह, किशोर सुधार गृह, खुले कारागृह, तसेच इतर कारागृहात ९ हजार कैद्यांना ठेवले आहे. क्षमतेपेक्षा १२ हजार ५३५ कैद्यांचा यात समावेश असून त्याची टक्केवारी १३६ इतकी आहे.