मुंबई : एक ५२ वर्षीय महिला पोटदुखीमुळे वर्षभरापेक्षा अधिक कालावधीसाठी त्रस्त होती. या महिलेवर महापालिकेच्या घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर या महिलेच्या पोटातून ११ किलो वजनाचे फायब्रॉइड म्हणजेच गर्भाशयाच्या मांसपेशींपासून तयार झालेली गाठ काढण्यात आली आहे, अशी माहिती राजावाडी रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली.
पोटदुखी मुळे महिला त्रस्त :एक ५२ वर्षीय महिला, रजोनिवृत्तीनंतरची पोटदुखीची तक्रार घेऊन घाटकोपर येथील महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये आली होती. रुग्णालयात महिलेची वैद्यकीय तपासणी केली असता पोटाचे आकारमान प्रमाणाबाहेर वाढल्याचे आढळले. त्यामुळे सोनोग्राफी आणि एमआरआय तपासणी करण्यात आली. त्यात गर्भाशयात खूप मोठे फायब्रॉइड आहे, ज्यामुळे रक्तवाहिन्या, आतडी, मूत्राशय विस्थापित झाले होते. या महिलेला वर्षभर झोपही लागली नव्हती. रक्तक्षय व हायपोथायरॉईडचा आजार देखील जडला होता असे निदर्शनास आल्याचे स्त्री-रोगतज्ञ डॉ. स्वाधीना मोहंती यांनी सांगितले.
अकरा किलोची गाठ काढली :वैद्यकीय तपासणी आणि अहवालानंतर या महिलेवर शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर काढण्यात आलेल्या फायब्रॉइडचे वजन ११ किलो होते. हे अत्यंत दुर्मिळ प्रकरण मानले जाते. ही शस्त्रक्रिया करीत असताना मोठ्या रक्तवाहिन्या सुरक्षित करण्यासाठी तसेच मूत्रवाहिन, मूत्राशय हे दोन्ही सुरक्षित राखण्यासाठी काळजीपूर्वक शस्त्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे शस्त्रक्रिये दरम्यान रक्तस्त्राव कमी झाला आणि रुग्णाच्या जीवाला कोणताही धोका पोहोचला नाही. आता सदर महिला रुग्ण शस्त्रक्रिये पश्चात पूर्ण बरी झाली आहे अशी माहिती डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली.