मुंबई - उस्मानाबाद, कळंब येथे सर्दी-ताप-अंगदुखीवरील बनावट औषधांचा साठा नुकताच जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए) कडून कारवाई सुरू असून केंद्रीय औषध प्रयोगशाळा, कोलकाता येथून औषधांच्या नमुन्याचा दुसरा अहवाल आल्यानंतर हिमाचल प्रदेशमधील उत्पादक कंपनीविरोधात एफडीएकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. असे असताना हिमाचल प्रदेश एफडीएने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यानुसार हिमाचल प्रदेश एफडीएने संबंधित औषध उत्पादक कंपनीला दणका दिला आहे. कळंबमध्ये आढळलेल्या बनावट औषधांच्या उत्पादनाचा परवाना रद्द केला आहे. ही बाब महत्वाची मानली जात आहे.
काय आहे नेमके प्रकरण -
कळंबमधील 9 डॉक्टरांनी एकत्र येत डीकेडी फार्मा एलएलपी ही कंपनी स्थापन केली. ही कंपनी हिमाचल प्रदेशमधील व्हिजन हेल्थ केअर या कंपनीकडून सर्दी-ताप-अंगदुखीवरील औषधे खरेदी करत. त्याचे मार्केटिंग आपल्या कंपनीच्या माध्यमातून करत होत्या. तर ही औषधे आपल्या रुग्णालयातील औषध दुकानात तसेच आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना विकत होते. ही औषधांबाबत काही साशंकता व्यक्त केली जात होती. त्यानुसार जून 2020 मध्ये एफडीएने कारवाई करत औषधाचे नमुने तपासणीसाठी औरंगाबादला पाठवले. सप्टेंबरमध्ये ही औषधे बनावट असल्याचा अहवाल आला. त्यानुसार या औषधांची विक्री-उत्पादन तत्काळ बंद करण्याचे आदेश एफडीएने संबंधित कंपनीला दिले. पण कंपनीने आरोप अमान्य करत 6 मार्चला औषधांचे नमुने कोलकाता येथील केंद्रीय औषध प्रयोगशाळेत पाठवले आहेत. याचा अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान 9 मार्चला जनआरोग्य हित आणि कोरोना काळ लक्षात घेता एफडीएने कळंबमधून बनावट औषधांचा 1 लाख 78 हजार 950 रुपयांचा साठा जप्त करत त्या 9 डॉक्टरांना दणका दिला आहे.