मुंबई - कोरोनापासून बचाव करण्यासाठीचे मुख्य शस्त्र म्हणजे मास्क. त्यामुळे, आता मास्कशिवाय पर्याय नसून सद्या नागरिकांचा कल कापडी मास्क, डिझायनर मास्क, कपड्यांना मॅचिंग मास्ककडे असल्याचे दिसते. पण हे मास्क कोरोना विषाणूला खरेच रोखू शकतात का? ते त्या गुणवत्तेचे आहेत का? असा प्रश्न आहे, असे म्हणत आता अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) थेट राज्य सरकारलाच पत्र लिहिले आहे. या पत्रानुसार कापडी मास्कची गुणवत्ता निश्चित करण्याची विनंती करण्यात आल्याची माहिती एफडीएचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्जिकल 2 प्लाय, 3 प्लाय आणि एन 95 मास्क वापरणे फायदेशीर असल्याचेही काळे यांनी सांगितले. ज्या महाराष्ट्रात कोरोनाने कहर केला, त्याच महाराष्ट्रात आता कोरोना नियंत्रणात आला आहे. यात आपल्या आरोग्य यंत्रणेचे यश आहेच, पण त्याचवेळी नागरिकांनीही मास्क, सॅनिटायझेशन आणि इतर सर्व नियम पाळले. त्यामुळे देखील कोरोना नियंत्रणात येण्यास मोठी मदत झाली. आता कोरोनाची दुसरी लाट आली असून दिल्ली, अहमदाबादमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. तर, महाराष्ट्रातही दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही लाट नक्की येईल की नाही, हे सांगता येणार नाही. पण, लाट येऊ नये व आलीच तर तिला परतवून लावण्यासाठी प्रत्येकाने मास्क लावणे गरजेचे आहे, असेही काळे यांनी स्पष्ट केले. एकूणच मास्क लावला तरच आपण या जीवघेण्या आजारापासून वाचू, असे काळे यांनी सांगितले.
सर्जिकल मास्कची टंचाई नाही
नागरिकांना स्वस्तात उपयुक्त असे 2 प्लाय 3 प्लाय आणि एन 95 मास्क उपलब्ध व्हावे यासाठी राज्य सरकारने मास्कच्या किमती निश्चित केल्या आहेत. त्यानुसार 2 प्लाय 3 रुपयात, तर 3 प्लाय 4 रुपयात आणि एन 95 मास्क 19 पासून 47 रुपयांपर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, हे दर लागू झाल्यापासून औषध दुकानातूनया प्रकारचे मास्क गायब झाले आहेत. या नव्या दरातील मास्क अद्याप उपलब्ध न झाल्याने, तसेच आहेत ते मास्क आम्हाला विकत मिळालेल्या दरात विकल्यास कारवाई होते, असे म्हणत अनेक औषध दुकानात हे मास्क उपलब्ध नसल्याचे चित्र असल्याचे काळे यांनी सांगितले.