मुंबई : कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसीवीर या औषधांचा तुडवडा असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. तर, काही डॉक्टर-रुग्णालयाकडूनही खासगीत औषध मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. पण अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) मात्र मुंबईसह राज्यात कुठेही या औषधाचा तुडवडा नसल्याचा दावा केला आहे. तर, रेमडेसीवीरचा मुबलकसाठा उपलब्ध असल्याचे म्हणत रुग्णांच्या नातेवाईकांनी काही अडचण आल्यास संपर्क करावा असे आवाहनही केले आहे.
रेमडेसीवीर औषधांचा मुबलक साठा, एफडीएचा दावा
कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसीवीर या औषधांचा तुडवडा असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. तर, काही डॉक्टर-रुग्णालयाकडूनही खासगीत औषध मिळत नसल्याचे सांगितले जात आहे. पण अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) मात्र मुंबईसह राज्यात कुठेही या औषधाचा तुडवडा नसल्याचा दावा केला आहे. तर, रेमडेसीवीरचा मुबलकसाठा उपलब्ध असल्याचे म्हणत रुग्णांच्या नातेवाईकांनी काही अडचण आल्यास संपर्क करावा असे आवाहनही केले आहे.
गंभीर तसेच व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना काही ठराविक तीन-चार औषधे दिली जातात. त्यातील एक म्हणजे रेमडेसीवीर. हे एक इंजेक्शन 5 हजार 400 रुपये किमतीचे असून एका रुग्णाला सहा इंजेक्शन लागतात. म्हणजेच जवळपास 40 हजार रुपये या इंजेक्शनवरच खर्च होतात. तर गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने या औषधाची मागणी ही वाढली आहे. पण ही औषधेच मुंबईत अनेक रुग्णांना मिळत नाहीत आणि औषधासाठी नातेवाईकांना वणवण करावी लागत असल्याची चर्चा आहे. 'ईटीव्ही भारत'ने यासंबंधीचा एक संदेश टाकत औषध मिळत नसल्याची तक्रार केली होती. अशा एका नातेवाईकाशी संपर्क साधला. त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर या औषधासाठी खुप फिरावं लागल्याचे सांगितले आहे. तर, काही डॉक्टरही हे औषध सहज मिळत नसल्याच्या तक्रारी करत आहेत.
एफडीएचे सहआयुक्त (औषध), मुख्यालय जुगल किशोर मंत्री यांनी मात्र रेमडेसीवीरचा अजिबात तुडवडा नाही असा दावा केला आहे. पालिका-सरकारी रुग्णालये, रुग्णालय परिसरातील औषध दुकाने आणि काही ठराविक औषध दुकानातच हे इंजेक्शन उपलब्ध आहे. असे असताना नातेवाईक आजूबाजूच्या औषध दुकानात इंजेक्शन शोधतात. त्यामुळे औषध मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत पण, प्रत्यक्षात टंचाई नाही. या औषधांचा मुबलक साठा आहे असेही मंत्री यांनी सांगितले आहे. त्यामुळे रुग्ण-नातेवाईकांनी चिंता करू नये. काही अडचणी असल्यास एफडीएशी संपर्क करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. सिप्ला आणि अन्य तीन कंपन्याना या इंजेक्शनच्या उत्पादन करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात तर आणखी मोठा साठा उपलब्ध होईल असेही मंत्री यांनी सांगितले आहे.