मुंबई :समाजातील मुलींची शिकण्याची ओढ आणि आयएएस आयपीएस शिक्षणाची मूलभूत गरज ओळखून 'हज कमिटी ऑफ इंडिया' यांचे माजी प्रमुख आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉक्टर मकसूद अहमद खान यांनी मुस्लिम धर्मातील मुलींना वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. मुंबईतील आपल्या या मुस्लिम बहुल वस्तीमध्ये मुलींसाठी युपीएससी आणि एमपीएससी परीक्षा संदर्भातील मार्गदर्शन प्रशिक्षण केंद्र करण्यासाठी त्यांनी स्वतः मेहनत घेतली आहे. आता मुलींना देखील एमपीएससी आणि यूपीएससी या क्षेत्रातील नेमकेपणाने मार्गदर्शन येथे उपलब्ध होणार आहे.
निवासी आणि बिगर निवासी प्रशिक्षण सोय :फातिमा मुसा पटेल हे मुस्लिम मुलींसाठी युपीएससी एमपीएससी प्रशिक्षणाचे पहिले केंद्र सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये वीस मुलींना केंद्र सामावून घेईल. त्यामध्ये निवासाची देखील व्यवस्था असेल आणि त्याशिवाय 30 विद्यार्थिनी ज्या अनिवासी असणार आहेत, त्यांना देखील यामध्ये कोचिंगसाठी प्रवेश मिळेल. जेणेकरून त्यांना देखील नागरी सेवांमध्ये भारताच्या विकासात योगदान देता येईल. त्या आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण घेऊ शकतील.
समाजातील प्रगतिशील मंडळींचा पुढाकार :या संदर्भात त्या ठिकाणचे माजी आमदार बशीर मुसा पटेल यांनी कळकळीने मुद्दा उपस्थित केला की, मुस्लिम मुलीमधील यूपीएससी एमपीएससी परीक्षांची तयारी त्यांना करायची आहे, अशा मुलींची गरज आम्ही ओळखली. अनेक वर्षापासून याबाबत काहीतरी करावे, असा विचार होता. डॉक्टर मकसूद खान यांनी पुढाकार घेतला आणि अनेक लोकांनी त्यांना मदत केली. त्यामुळे आता उच्च शिक्षणामधील अशा विशेष प्रशिक्षणाची गरज येथे पूर्ण होईल.
मुलींसाठी नागरी सेवा प्रशिक्षण गरजेची :या केंद्राच्या संचालिका झुबिया शेख यांनी यासंदर्भात एका महत्त्वाच्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ही बाब मांडली की, देशाच्या सच्चर आयोगाच्या अहवालात मुस्लिमांचे नागरी सेवेत प्रतिनिधित्व फार कमी आहे. ते नागरी सेवांमध्ये फक्त तीन टक्के आहे. त्यामुळेच असे प्रशिक्षण केंद्र मुलींना शिकायला प्रेरित करू शकते. त्यांचाही ठसा यूपीएससी सारख्या परीक्षांमध्ये उमटू शकतो.