नवी मुंबई :दुसऱ्या पत्नीसोबत झालेल्या वादातून एका पित्याने त्याच्या पोटच्या चार वर्षीय मुलाची डोके आपटून हत्या केली आहे. ही घटना नवी मुंबईतील सानपाड्यात घडली आहे. सानपाडा रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर या क्रूर पित्याने स्वतःच्याच चार वर्षीय मुलाचे एक दोन नव्हे तर तीन वेळा डोके आपटले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोटच्या मुलाचा खून करणाऱ्या त्या नराधम पित्याला वाशी जीआरपी पोलिसांनी गजाआड केले आहे.
वाद दुसऱ्या पत्नीसोबत, मात्र जीव घेतला पहिल्या पत्नीच्या मुलाचा
सकलसिंग पवार असे त्या नराधम पित्याचे नाव आहे. तो मूळच्या यवतमाळ येथील भटक्या कुटुंबातील आहे. नवी मुंबईतील सानपाडा पुलाखाली तो त्याच्या परिवारासह राहत होता. भीक मागून गुजराण करत होता. सकलसिंह पवार आणि पत्नीचे नेहमी वाद होत असत. घटनेच्या दिवशी भांडण करत असताना रेल्वे स्थानकावर पोहोचले. यावेळी फलाटावर सर्वजण एकत्र चालत असताना सकलसिंग पवार याचा त्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत वाद सुरू होता. या वादातून त्याने स्वःताचा चार वर्षांचा मुलगा प्रशांत याला उचलून फलाटावर आपटले. स्टेशनवर असणाऱ्या लोकांनी त्याला अडवण्याचाही प्रयत्न केला. मात्र तो सतत मुलाला उचलून जोराने खाली फेकत होता. एका प्रवासी महिलेनेही त्याला अडवून मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही सकलसिंग हा चिमुकल्याला उचलून आपटत राहिला. त्यातच त्या मुलगा मृत्यू झाला. प्रशांत असे त्या मुलाचे नाव. प्रशांत हा सकलसिंगच्या पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा होता. त्याची पहिली पत्नी गावी राहत आहे. सकलसिंग हा सध्या दुसरी पत्नी मेहेर हिच्यासोबत नवी मुंबईत सानपाड्यात राहत होता.