मुंबई -शेतकरी आणि कामगार कायद्यांच्या विरोधात, राजभवनवर मोर्चासाठी नाशिकहून निघालेले शेतकरी आंदोलक काल (रविवार) मुंबईत दाखल झाले. आझाद मैदानात आज होणाऱ्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आदी सहभागी होणार आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेच्या नेतृत्वाखाली राज्याच्या २१ जिल्ह्यामधून शेतकरी व कामगार हे नाशिकहून मुंबईत दाखल झाले. याबाबत आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांच्याशी बातचीत केली. पाहा काय म्हणाले नवले...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, शेतीमालाला आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करा, वीज विधेयक मागे घ्या, कामगार संहितेमधील कामगार विरोधी बदल रद्द करा, वनजमीन तथा देवस्थान, गायरान, आकारीपड, बेनामी व वरकस जमीन कसणारांच्या नावे करा आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू करून सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्या, या मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.