मुंबई :राज्यात एकीकडे होली व रंगपंचमी जोरात साजरी केली जात आहे. दुसरीकडे वादळी वारे, पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. नाशिक, नगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, पुणे, जालना, पालघर, संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीमुळे संपूर्ण शेतीचे नुकसान झाले आहे. शेतात उभी असलेली पिके भुईसपाट झाली आहेत. यामध्ये प्रामुख्याने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांद्याबरोबर भाजीपाला आणि द्राक्ष, डाळिंब,पपई, केळी, आंबा या फळबागानांही मोठा फटका बसला आहे.
शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा : अनेक ठिकाणी तर काढणीला आलेल्या पिकांचे पावसाने मोठे नुकसान झाले आहे. ६ हजारपेक्षा जास्त हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. हा आकडा अजून मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. आढावे व पंचनामे केल्यानंतर याच्यातील वस्तुस्थिती समोर येणार आहे. आता या सर्व कारणास्तव शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीच्या अपेक्षाशिवाय त्यांच्या नशिबी काही उरले नाही आहे.
शेतकरी मेटाकुटीला :यापूर्वीच कांद्याचे दर घसरल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना, आता या अवकाळी पावसाने त्यांचे अजून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर रब्बी व बागायती पिकांचे सुद्धा मोठ्या नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक विभागातील धुळे जिल्ह्यात गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जळगाव, नंदुरबार, नाशिक व नगर जिल्ह्यातही शेतीमालाचे नुकसान झाले आहे. तर विदर्भ, मराठवाड्यात सुद्धा या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तिथेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे रब्बी हंगामातील कांदा, हरभरा, गहू व इतर फळांच्या पिकाची सुद्धा नासाडी झाली आहे. शेतकरी मेटाकुटीला आला आहे.