मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शेतकऱ्यांचे बाबतीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना सरसकट २ लाखापर्यंतची कर्जमाफी देणार असल्याची घोषणा त्यांनी सभागृहात केली. मात्र, या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असे म्हणत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. या सरकारने केलेल्या या कर्जमाफीबाबत शेतकरी नेते समाधानी नसल्याचे दिसून येत आहे. या कर्जमाफीच्या निर्णयाबाबत शेतकरी नेत्यांशी ईटीव्ही भारतने संवाद साधला. पाहूया नेमकं काय वाटतंय त्यांना...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेवर शेतकरी नेते नाराज आहेत. सरकारने घेतलेला निर्णय योग्य नसल्याचे बोलले जात आहेत. सरकारने सरसकट कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्याचे शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे.
कर्जमाफीच्या निर्णयावर समाधानी नाही, सातबारा कोरा करा - राजू शेट्टी
सरकारच्या या कर्जमाफीवर मी समाधानी नाही. या कर्जमाफीचा लाभ फार कमी लोकांना होणार असल्याची प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली. या सरकारने सातबारा कोरा करणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तसे झाले नाही. कर्जमाफीची आज जी घोषणा करण्यात आली, त्यात केवळ ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतच्याच थकबाकीदारांचे कर्ज माफ होणार आहे. महापूर, अतिवृष्टी आणि दुष्काळामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांचे यावर्षीच्या महापुरात आणि दुष्काळात पिकांचे नुकसान झाले आहे. त्या पिकांसाठी कर्ज काढले आहे. त्यामुळे ज्यांचे या महापुराने आणि दुष्काळाने नुकसान झाले आहे त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नसल्याचे शेट्टी म्हणाले.
कर्जमाफीचा निर्णय म्हणजे सरकारची हातचलाखी - सदाभाऊ खोत
कर्जमाफीच्या बाबतीत सरकारने हातचलाखीचा खेळ खेळला असल्याचे म्हणत रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी सरकारवर निशाणा साधला. सुरुवातीला या सरकारने सातबारा कोरा करणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तसा निर्णय त्यांनी घेतला नाही. फक्त मोजक्याच शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. शेतकऱ्यांकडे अनेक प्रकारचे कर्ज असते. शेतीसाठी ट्रॅक्ट, विहीर, पाईपलाईन यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज काढले आहे. अनेक शेतकऱ्यांकडे ५ लाखांच्यावरही कर्ज आहे. ते शेतकरी या कर्जमाफीत बसणार नसल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले.
शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाला तडा - अजित नवले