मुंबई -आंतरराष्ट्रीय किर्तीचे कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांचे मोठे बंधू आणि प्रसिद्ध कामगार नेते पुरुषोत्तम सामंत तथा दादा सामंत यांचे वृद्धापकाळाने आज (शुक्रवार) निधन झाले. बोरिवली येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
प्रसिद्ध कामगार नेते दादा सामंत यांचे निधन दत्ता सामंत यांची हत्या झाल्यानंतर कामगार आघाडीची धुरा दादा सामंत यांनी समर्थपणे पेलली. कामगार चळवळीत ते अखेरपर्यंत कार्यरत होते. वय झाले असूनही कामगार संघटनांच्या विविध न्याय प्रकरणात ते कामगार न्यायालयातही उपस्थिती दर्शवत होते. 1997 ते 2011 पर्यंत ते कामगार आघाडीचे अध्यक्ष होते. 1981 च्या गिरणी कामगार संपानंतर त्यांनी ग्वाल्हेर येथील गिरणीमधील चांगली नोकरी सोडून कामगार चळवळीत स्वतःला झोकून दिले होते. कामगार कायद्याबाबत त्यांचा अभ्यास दांडगा होता.
दादा सामंत हे कामगार चळवळीतलं अभ्यासू व्यक्तिमत्त्व होतं. मुंबईतील 'सिध्दार्थ महाविद्यालया'तून बी. एस्सी. झाल्यावर त्यांनी १९५३ ते १९६० पर्यंत पश्चिम रेल्वेत नोकरी केली. त्यावेळी 'वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज युनियन'चे मुंबई विभागीय सचिव होते. १९६० मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संपाचं नेतृत्व केल्यामुळं त्यांना बडतर्फ व्हावं लागलं होतं. त्यानंतरही एक ते दीड वर्ष त्यांनी संघटनेचं विनावेतन पूर्ण वेळ काम केलं. नंतर मुंबईतील 'दिग्विजय मिल'मध्ये सुपरवायझरची नोकरी स्वीकारली. सुमारे २१ वर्षे अनेक गिरण्यांत मोठ्या हुद्यांवर नोकऱ्या केल्या. ऑक्टोबर १९८१मध्ये ग्वाल्हेरच्या 'ग्वाल्हेर रेयॉन ग्रुप'मध्ये काम करताना, सामंत तसेच कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ती नोकरी सोडून १९९७पर्यंत ते 'कामगार आघाडी'चे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
१६ जानेवारी १९९७ रोजी डॉ. दत्ता सामंत यांच्या हत्येनंतर 'कामगार आघाडी'ची अध्यक्षपदाची सूत्रे त्यांच्याकडे आली. व्यवस्थापनात व कामगार संघटनेत काम केल्यामुळे त्या अनुभवाचा फायदा 'कामगार आघाडी'ला दैनंदिन कामासाठी झाला. त्यामुळे आज इतर अनेक कामगार संघटनांपेक्षा 'कामगार आघाडी'चा कारभार शिस्तबध्द दादा सामंत यांनी चालविला होता. कामगार तसेच इतरही विविध विषयांवर लेखन करण्याची आणि परिसंवादात्मक भाषणांची त्यांची हातोटी होती. त्यामुळेच त्यांना कामगारांची बाजू मांडण्यासाठी आवर्जून आमंत्रित करण्यात येत असत. कामगारांचे कायदेशीर सल्लागार म्हणूनही त्यांची ख्याती होती. 'श्रमिक युद्ध' हे केवळ कामगार विषयावरील पाक्षिक १९८१ ते १९९०पर्यंत चालवून त्या काळातील कामगार चळवळीचा इतिहास जतन केला होता.
कामगार वर्गावर होऊ घातलेल्या जागतिकीकरण, खासगीकरण या धोरणाच्या संकटामुळे सर्व कामगार संघटनांनी एकत्र होऊन लढा द्यावा, या विचाराचा पुरस्कार त्यांनी केला. सुमारे ३१ कामगार संघटनांच्या 'संयुक्त कृती समिती'मध्येही त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या जाण्याने कामगार चळवळीचे खूप मोठे नुकसान झाले आहे, असे त्यांच्या अनेक मुलाखती घेणारे ज्येष्ठ पत्रकार मुकुंद लांडगे यांनी सांगितले.
कामगार चळवळीतील एक ज्येष्ठ व कामगार कायद्यावरील अभ्यासू कामगार नेता हरपला, अशी भावना व्यक्त करून मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने ज्येष्ठ कामगार नेते अॅड. एस. के. शेट्ये, युनियनचे जनरल सेक्रेटरी व मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त सुधाकर अपराज, मारुती विश्वासराव यांनी गोदी कामगारांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.