मुंबई -'एक डोस घेतलेल्यांना निदान चौथ्या सीटवर तरी बसू द्या', 'ज्यांनी लसीचा एक डोस घेतला त्यांना किमान गेटवर तरी लटकू द्या' अशा अनेक मिम्सचा पाऊस मुख्यमंत्र्याच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर पडला. कोरोना लसीचे दोन डोस घेणाऱ्या प्रवाशांना १५ ऑगस्ट २०२१ पासून लोकल प्रवासाची मुभा देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (8 ऑगस्ट) केली. त्यानंतर प्रसिद्ध कॉमेडियन अतुल खत्री यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अतुल खत्री यांनी चक्क लसीकरण प्रमाणपत्र छापलेला पांढरा टी-शर्ट घातलेला फोटो ट्विट केला. मात्र हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.
टी-शर्टवरच छापले लसीकरणाचे प्रमाणपत्र -
कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबईमधील लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी मुभा द्यावीत अशी मागणी गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात होत होती. त्यानुसार रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत असताना लसीचे दोन डोस घेणाऱ्या प्रवाशांना १५ ऑगस्ट २०२१ पासून लोकल प्रवासाची मुभा देण्याची घोषणा केली. मात्र, ही घोषणा होताच सोशल मीडियावर लसीचा एक डोस घेतलेल्या प्रवाशांनी अनेक विनोदी मिम्स तयार करून आम्हाला सुद्धा लोकल प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी केली. आज अनेक मिम्स सोशल मियावर प्रचंड व्हायरल झाले. त्यातच प्रसिद्ध कॉमेडियन अतुल खत्री यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अतुल यांनी थेट आपल्या टी-शर्टवरच लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र छापले आहे. त्यांच्या या फोटोला ९ हजारापेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून नेटकरी या फोटोचे मिम्स तयार करत असल्याचे दिसून येत आहे.