मुंबई -वसतीगृहामध्ये विनाशुल्क प्रवेशासाठी विद्यार्थ्याच्या कुटुंबाची उत्पन्न मर्यादा अडीच लाख रुपये इतकी होती. पण, आता ही मर्यादा वाढविल्याने आठ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना वसतीगृहामधील विविध सुविधा विनाशुल्क उपलब्ध होणार आहेत.
अल्पसंख्याक म्हणजेच मुस्लीम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख, पारसी व ज्यू समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना वसतिगृहामध्ये विनाशुल्क प्रवेश घेण्यासाठी आता या विद्यार्थ्यांच्या कुटूंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा आठ लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये पुरविण्यात येणाऱ्या खोलीभाडे, पाणी, वीज इत्यादी सुविधांचे शुल्क पूर्णपणे माफ असेल, असे त्यांनी सांगितले.
आतापर्यंत वसतीगृहामध्ये विनाशुल्क प्रवेशासाठी विद्यार्थ्याच्या कुटुंबाची उत्पन्न मर्यादा अडीच लाख रुपये इतकी होती. पण, आता ही मर्यादा वाढविल्याने आठ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना वसतीगृहामधील विविध सुविधा विनाशुल्क उपलब्ध होणार आहेत. कुटुंबाचे उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा जास्त असलेले विद्यार्थीही वसतीगृह प्रवेशासाठी पात्र असून त्यांना माफत दरात या सुविधा देण्यात येतील.