महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ट्रॅव्हल एजन्सीचा कारनामा; प्रवासी वाहतुकीसाठी बनावट कोरोना रिपोर्टचा वापर - मुंबई बनावट कोरोना रिपोर्ट प्रवासी वाहतूक

महाराष्ट्रातून इतर राज्यात जाण्यासाठी नकली कोरोना रिपोर्टचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

Mumbai fake corona reports news
मुंबई बनावट कोरोना रिपोर्ट बातमी

By

Published : Apr 16, 2021, 1:07 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना बनावट कोरोना रिपोर्ट बनवून देण्याची धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत. महाराष्ट्रामधून राजस्थानमध्ये जाण्यासाठी नकली कोरोना रिपोर्टचा वापर करणाऱ्या प्रवासी, ट्रॅव्हल बस चालक आणि एजंटवर घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

काय आहे प्रकरण -

घाटकोपर येथील सर्वोदय सिग्नल जवळून विश्वकर्मा ट्रॅव्हल्सने बुधवारी रात्री ४० प्रवासी राजस्थानला जात होते. ट्रॅव्हल्सने प्रवास करताना बनावट कोरोना रिपोर्ट वापरले जात असल्याची माहिती महानगरपालिका एन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळाली होती. माहितीनुसार पालिका एन विभागाचे वैद्यकीय अधिकारी महेंद्र खंदारे यांनी घाटकोपर पोलिसांना सोबत घेऊन बुधवारी रात्री राजस्थानला जाणाऱ्या विश्वकर्मा ट्रॅव्हल्समधील प्रवाशांची तपासणी केली. यावेळी अनेक प्रवाशांकडे एकच आयडी असलेले कोरोना रिपोर्ट आढळले. याबाबत संबंधित लॅबकडून माहिती मागवली असता हे रिपोर्ट बनावट असल्याचे समोर आले. याबाबत पालिका एन विभागाने घाटकोपर पोलिसांकडे तक्रार देऊन बस चालक, ट्रॅव्हल एजंटसह २३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

घाटकोपर पोलिसांनी याप्रकरणी भैरवसिंग देवसिंह कितावत(वय २३), श्रवण सिंह भाटी(वय ३१), रोशनलाल जाट(वय ४२), गजानंद दमानी(वय ४३), रोशन सुतार(वय २४), अशोक शर्मा(वय ४०) यांना अटक केली आहे. तर इतरांची चौकशी सुरू आहे. या बसमध्ये दहा ते बारा लहान मुले देखील होती. महाराष्ट्रामधून इतर राज्यात गेल्यास कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा असल्याने अशा प्रकारे प्रवासी बनावट रिपोर्ट बनवून प्रवास करत असल्याचे समोर येते आहे. ट्रॅव्हल्स एजंट जास्त पैसे आकारून असे अहवाल बनवून देत असल्याचेही समोर येत आहे. त्यामुळे नकली कोरोना रिपोर्टचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकार काय उपाय करते हे, पाहणे गरजेचे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details