मुंबई : मिळालेल्या माहितीनुसार, नाणे बनवण्याचा हा कारखाना हरियाणामध्ये चालवला जात होता. ज्यामध्ये दिल्लीच्या स्पेशल सेलने कारवाई करत 5 जणांना अटक केली. आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे लोक मुंबईत मोठ्या प्रमाणात बनावट नाणी आणायचे आणि धार्मिक ठिकाणी फुकट पैसे देण्याच्या नावाखाली खरे पैसे घ्यायचे. खोट्या नाण्यांचा गोरखधंदा बऱ्याच काळपासून सुरू होता.
दिल्ली पोलीस मुंबईत :दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जीवन खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल मुंबईत आला होता. दिंडोशी पोलिस ठाण्याच्या हद्दीत खोट्या नाण्यांचा धंदा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. या माहितीच्या आधारे दिंडोशी पोलीस ठाण्याचे पीआय कवडे आणि एपीआय गोकुळ पाटील यांच्या पथकाने दिल्ली पोलिसांसह मालाड पुष्पा पार्क येथील वल्लभ ए विंग सोसायटीत संयुक्त कारवाई केली. तेथून मोठ्या प्रमाणात बनावट नाणी जप्त करण्यात आली.
संयुक्त कारवाईने खळबळ :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीआय सोमिल शर्मा, पीएसई शवी, पीएसआय कुमावत आणि दिल्ली स्पेशल सेलच्या टीमने दिंडोशी पोलिसांसोबत संयुक्त कारवाई करून आरोपी जिग्नेश गाला याला अटक केली.
9 लाखांची कृत्रिम नाणी जप्त :मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पा मालाड येथील वल्लभ सोसायटीच्या इमारतीत आरोपी जिग्नेश गाला (४२) याच्या कारमधून सुमारे ९ लाख ४६ हजार कृत्रिम जुनी नाणी जप्त करण्यात आली आहेत. आरोपींना पकडण्यासाठी दिंडोशी पोलिसांना मोठी धडपड करावी लागली. सोसायटीकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिग्नेश गेल्या अनेक दिवसांपासून कॉईन मेकिंग मशीनची निर्यात आणि आयात करत होता. सध्या दिल्ली पोलिसांनी जिग्नेस आणि त्याच्या कारसह बनावट नाणी ताब्यात घेतली आहेत.
बनावट नोटा जप्त :हॉटेल व्यवसाय सुरू करून सुख समाधानाचे आयुष्य जगावे यासाठी सोलापूर जिल्ह्यातील कुर्डवाडी हद्दीत एका कॉलेज तरुणाने बनावट नोटा छापण्याचा उद्योग सुरू केला. मात्र, पोलिसांच्या पारखी नजरेतून तो सुटू शकला नाही. पोलिसांनी बनावट नोट प्रकरणी 14 डिसेंबर, 2022 रोजी चार जणांना अटक केली होती. तरुणाला अटक करून अडीच लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. आरोपी हुबेहूब 500 च्या नोटा छापल्यानंतर चौघे ग्राहक शोधत होते. त्यावेळी सोलापूर ग्रामीण क्राईम ब्रँचला याची माहिती मिळाली.
पोलिसांच्या चलाखीपुढे आरोपी हतबल : सोलापूर जिल्ह्यातील कुर्डवाडी हद्दीत एका महाविद्यालयीन तरुणाला अटक करून अडीच लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. ग्रामीण क्राईम ब्रँचने खोलात तपास करून आणखी तिघांना ताब्यात घेतले. चौघांना अटक करून त्यांच्या कडून प्रिंटर, संगणक, नोटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी या चौघांना अटक करून अधिक माहिती विचारली असता, त्यांनी आयुष्यात सेटल होण्यासाठी किंवा कोणताही एक व्यवसाय करण्यासाठी हा बनावट नोटांचा उद्योग सुरू केल्याची माहिती दिली. याबाबत पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी अधिकृत माहिती दिली.
हेही वाचा :Haqqani Network Vs India : हक्कानी नेटवर्क भारत आणि अफगानिस्तानच्या मैत्रीत ठरतोय अडथळा; भारताची चिंता वाढली