मुंबई - राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन गदारोळ विधिमंडळापर्यंत पोहोचला आहे. राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन विधिमंडळ परिसरातच करण्यात आले. त्यानंतर सभागृहात याचे पडसाद उमटले. याप्रकरणी ज्यांनी आंदोलन केले त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसच्या आमदारांनी केली. सभागृहातील वातावरण यामुळे तापले होते. या सगळ्याचा परिणाम सभागृहाचे पावित्र्य भंग होण्यात होत असल्याचे दिसून आल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही बााजूने सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. तसेच भाजपच्या आमदारांचे आंदोलनही चुकीचच असल्याचे ते म्हणाले. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरील आंदोलन असो किंवा निदर्शने सर्वच राजकीय पक्षांनी विधानभवन परिसरात सभ्यता पाळावी, असे आवाहन फडणवीस यांनी केले.
कोट्यवधीचा घोटाळा करत ललित मोदी, नीरव मोदी यांनी, देशाबाहेर पलायन केले. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. गुरुवारी महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्प अधिवेशनात सत्ताधाऱ्यांनी निदर्शने केली. सत्ताधाऱ्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. कॉंग्रेसचे सदस्य भाई जगताप यांनी, आज पॉइंट ऑफ इन्फर्मेशन अंतर्गत हा मुद्दा परिषदेच्या पटलावर चर्चेसाठी आणला. कॉंग्रेसचे सतेज पाटील यांनी या मुद्द्याला पाठिंबा दिला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, यासंदर्भात खुलासा केला.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, झालेला प्रकार निंदनीय आहे. पायऱ्यांवर अशा प्रकारचे आंदोलन करणे योग्य नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविरोधात होणारे आंदोलनात पच्चास खोके, चोर, गद्दार, मिंधे आदी विशेषण विरोधकांकडून लावली जातात. मुख्यमंत्र्यांचा अशा प्रकारे अवमान करणे, योग्य नाही. दोन्ही बाजूने आंदोलन करताना, सभ्यता पाळली गेली पाहिजे. चुकीच्या पध्दतीने कोणी आंदोलने करत असले तर त्यांना समज द्या. विधानभवनात चुकीचा पायंडा पडू देऊ नका, असे आवाहन फडणवीस यांनी केले.