मुंबई २६/११ Mumbai Terror Attacks : हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांमध्ये केवळ भारतीय नाही तर परदेशी नागरिकांचाही समावेश होता. या आत्मघाती हल्ल्यात पाकिस्तानमधून आलेल्या 10 पैकी 9 दहशतवाद्यांना भारतीय सुरक्षा यंत्रणांनी कंठस्नान घातलं (Mumbai Terror Attacks 15th Anniversary) होतं. या कारवाईमध्ये अजमल कसाब हा एकमेव दहशतवादी जिवंत पकडण्यात आला होता. नंतर त्याला फाशी देण्यात आली. त्या आठवणींना उजाळा देताना अनेकांना आजही अश्रू अनावर होतात.
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा थरारक प्रसंग :26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या साक्षीदार देविका रोटवान यांनी त्यादिवशीचा थरारक प्रसंग सांगितला. त्या सांगतात की, माझे वडील, भाऊ आणि मी पुण्याला जाणार होतो. त्यासाठी आम्ही सीएसटी रेल्वे स्टेशनवर गेलो होतो आणि त्याचवेळी तिथं स्फोट झाला आणि गोळीबार सुरू झाला. घाबरून लोकांनी धावपळ सुरू केली. तिथं मी एक व्यक्ती पाहिली, ज्याच्या हातात मोठी बंदूक होती आणि तो सतत गोळीबार करत होता. यात मलाही गोळी लागली होती. त्यानंतर जखमी स्थितीत मला जेजे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आणि दीड महिने मी तिथे राहिले.
तो दिवस कधीही विसरणार नाही : मुंबई दहशतवादी हल्ल्यात करुणा ठाकूर वाघेला यांनी आपले पती गमावले. त्या आठवणी सांगतात त्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला. ती घटना माझ्या डोक्यातून कधीच जाणार नाही. सरकार सर्वकाही देईल पण माझा पती माझ्या आयुष्यातून गेला ते कोणी भरून देऊल का? 26/11 च्या आठवणी घेऊन तुम्ही आजच्या दिवशी आमच्याकडं येतात. इतर दिवशी आम्हाला कोणी विचारतही नाही. तरीही त्या वेदना आम्हाला रोजच राहतात. माझा मुलगा त्या आठवणी आल्या की रडतो, असं करुणा ठाकूर वाघेला यांनी सांगितलं.
माझ्या पतीला गोळ्या घातल्या : करुणा ठाकूर वाघेला पुढं सांगतात की, घरी माझा मुलगा आणि पती जेवण करत बसले होते. त्यावेळी दहशतवादी कसाब तिथं आला आणि त्यानं पाणी मागितलं. माझ्या पतीनं त्याला पाणी दिलं व त्यानंतर ते जेवणासाठी परत खाली बसले. त्यांना वाटलं की पाणी पिऊन हा ग्लास खाली ठेवेन. पण, त्या कसाबनं माझ्या पतीला मागून गोळी मारली. हे पाहून माझा मुलगा दुसऱ्या खोलीत जाऊन लपून बसला आणि त्यामुळं तो वाचला.
हेही वाचा -‘असा’ झाला होता 26/11 चा दहशतवादी हल्ला; अनेकांचे जीव वाचवणारा छोटू चायवालाने सांगितल्या कटू आठवणी