मुंबई -आगामी दिवाळी सण आणि येणाऱ्या सलग सुट्यांमध्ये पर्यटनाला गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांच्या भेटीसाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातील आगारातून दररोज सुमारे 1 हजार जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. 29 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर, 2021 या कालावधीत या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली. यावेळी त्यांनी प्रवाशांनी जादा गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहननही केले आहे.
एक हजार जादा गाड्या धावणार
दिवाळीच्या सुट्टीत प्रवाशी महाराष्ट्रातील अनेक पर्यटन स्थळांना भेट देतात. तर अनेक जण आपापल्या गावी जातात. किफायतशीर दर आणि सुरक्षित प्रवास म्हणून प्रवासी दरवर्षी एसटीतून प्रवासाला प्राधान्य देतात. गेल्यावर्षी राज्यावर असलेले कोरोनाचे संकट पाहता प्रवाशांनी पर्यटनाकडे पाठ फिरवली होती. यंदा महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी नियमित गाड्या व्यतिरिक्त राज्यभरातील आगारातून दररोज एक हजार जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सुट्यांमुळे प्रवाशांची होणारी वाढती गर्दी पाहता गाड्यांचे योग्य नियोजन करा, सर्व बसेस सुस्थितीत ठेवा. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमिवर खबरदारीचा उपाय म्हणून सर्व गाड्या स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण कराव्यात, असे निर्देश मंत्री, ॲड. परब यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच प्रवाशांनीही प्रवासादरम्यान कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.