मलाड (मुंबई) : मुंबईच्या कुरार पोलिसांना ४ दिवसांपूर्वी कबड्डी स्पर्धेत डॉन छोटा राजनचे पोस्टर बॅनर लावण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सर्व पोस्टर बॅनर जप्त केले. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे गुंडाचे फोटो लावल्याच्या आरोपावरून कुरार पोलिसांनी 6 जणांना अटकही केली होती. चौकशीत आरोपींनीच पोस्टर्स आणि बॅनर लावून कबड्डी स्पर्धा प्रसिद्ध केल्याचे समोर आले. राजनच्या नावाने थेट वसुलीचा धंदा करत, आरोपींनी वसुलीसाठी एक एनजीओही उघडली होती. त्या एनजीओच्या नावावर लोकांकडून बेकायदेशीरपणे वसुली केली जात होती. एनजीओच्या नावावर लोकांकडून पैसे घेऊन छोटा राजनचा फोटो असलेल्या पावत्या देण्यात आल्या. यावरून ते छोटा राजनच्या टोळीतील आहेत आणि त्याला पैसे देऊन स्वतःचे संरक्षणही करत असल्याचा स्पष्ट संदेश लोकांना मिळत होता.
कबड्डी स्पर्धेत छोटा राजनचे बॅनर :पोेलीस गस्तीदरम्यान कुरार पोलीस ठाणेच्या हद्दीत बीटमध्ये अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याच्या वाढदिवसानिमित्ताने गणेश मैदान तनाजी नगर, कुरार गाव, मालाड पूर्व, मुंबई येथे कबड्डी स्पर्धाचे आयोजन करण्यात आल्याचे बॅनर ठिकठिकाणी लागले असल्याचे दिसले. हे बॅनर विनापरवाना लावले असल्याने कुरार पोलीस ठाण्यात बॅनर लावणाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याचा फोटो लावून पावती पुस्तक छापून स्थानिक लोकांकडून खंडणी स्वरुपात पैसे वसूल केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.