मुंबई -मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा कुर्ला आणि सायन येथे पावसाचे पाणी साठल्याने बंद करण्यात आली आहे. दरम्यान, नाले स्वच्छ न झाल्याचा फटका रेल्वे सेवेला बसल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे. मागील 12 वर्षांत 30 कोटींहून अधिक रक्कम रेल्वेच्या 116 नाल्यांवर खर्च करण्यात आले असून, 30 कोटी पाण्यात वाहून गेले असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
'नाले स्वच्छ न झाल्याचा रेल्वेला फटका'
मुंबईतील रेल्वे अंतर्गत नाल्या प्रत्येक वर्षी रेल्वे प्रशासन स्वच्छ करते. पालिका प्रत्येक वर्षी 3 ते 4 कोटी रुपये यासाठी खर्च करते. मागील 12 वर्षात रेल्वेला 30 कोटी प्राप्त झाले आहेत. मात्र, आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे ऑडिट ना रेल्वेने केले, ना पालिकेने केलेल्या खर्चाचा हिशोब मागितला. आज मुंबई रेल्वे सेवेअंतर्गत 116 नाले असून, 53 मध्य रेल्वे, 41 पश्चिम रेल्वे आणि 22 हार्बर रेल्वेत आहेत. वर्ष (2009-2010) ते वर्ष (2017-18) या 9 वर्षात 23 कोटी रुपये मुंबई पालिकेने रेल्वे प्रशासनाला दिले होते. वर्ष (2018-19)मध्ये 5.67 कोटी रुपये दिले होते. एकंदरीत मागील 12 वर्षात 30 कोटीहून अधिक रक्कम देण्यात आली आहे. यावर्षी पालिकेने सीएसएमटी ते मुलुंडपर्यंतच्या रेल्वेच्या सर्व नाल्यांची सफाई अवघ्या 15 दिवसांत पूर्ण करण्याचा दावा केला आहे.