मुंबई CM Eknath Shinde Davos Tour: दावोस येथे होत असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत यंदाही महाराष्ट्र सरकारच्या वतीनं सहभाग घेतला जाणार आहे. गेल्या वर्षीही राज्य सरकारच्या वतीनं या परिषदेत सहभाग घेतला गेला होता आणि कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आल्याचा दावा, मुख्यमंत्र्यांनी केला होता. यावर्षी या दौऱ्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीनं 34 कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.
दावोसमध्ये काय आहे नियोजन? : दावोसमध्ये या आर्थिक परिषदेसाठी सहभागी होणाऱ्या शिष्टमंडळातील सदस्यांचा व्हीजा, विमान प्रवास, स्थानिक प्रवास खर्च, राहण्याची व्यवस्था आणि सुरक्षेच्या उपायोजनांसाठी मिळून 18 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 15 ते 19 जानेवारी दरम्यान येथे होत असलेल्या आर्थिक परिषदेसाठी राज्य सरकारकडून सहभागी होणाऱ्या शिष्टमंडळाचा खर्च महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून उचलण्यात येतो. परिषदेसाठी भोजन व्यवस्था, सजावट इत्यादी बाबीही यात अंतर्भूत आहेत. या परिषदेत राज्य सरकारच्या वतीनं दालन कक्ष आरक्षित करण्यासाठी यापूर्वीच चार कोटी रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. तर भोजन व्यवस्था, सजावट आणि दालनाच्या उभारणीसाठी सुमारे 16 कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. तर खानपानासाठी सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
18 कोटींचा काय असणार खर्च? : दावोस आर्थिक परिषदेसाठी जाणाऱ्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या शिष्टमंडळामध्ये असणाऱ्या सदस्यांचा विजा आणि विमान प्रवास त्यांच्या भोजनाची, निवासाची व्यवस्था त्यांच्यासाठी असलेली सुरक्षा व्यवस्था, भेटवस्तू तसेच दैनिक भत्ता आणि विमा यांचा यात समावेश आहे. यासोबतच परिषदेसाठी लागणाऱ्या प्रसिद्धी साहित्य, कुरिअर आणि फिल्म तयार करण्याचा खर्च या संपूर्ण व्यवस्थेसाठी 18 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार असल्याची माहिती, एमआयडीसीतील अधिकाऱ्यांनी दिली. या 18 कोटी रुपयांच्या नियोजनात चार्टर्ड विमानाचा खर्चही अंतर्भूत करण्यात आला आहे. यासंदर्भात एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी केवळ हा प्रोटोकॉल प्रमाणे नियोजित दौरा आणि खर्चाची तरतूद असते इतकंच सांगितलं.