मुंबई: बँकिंग, रिअल इस्टेट, उद्योग, सोने व्यापार यांच्यासहित सामान्य नागरिक देखील या बजेटकडे आशेने पाहत आहे. सादर होणाऱ्या या बजेटमधून आपापल्या क्षेत्राला दिलासा मिळावा अशी सर्वांकडूनच विनंती होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी काही दिवसापूर्वीच परवडणाऱ्या घरांवरचा जीएसटी कमी करण्याचे संकेत दिले आहेत. अर्थमंत्र्यांचे हे पाऊल स्वागतार्ह असल्याचे महाराष्ट्र बिल्डर असोसिएशनचे चेअरमन राजेंद्र सावंत यांनी मत व्यक्त केले आहे.
घरांच्या किमतीवर जीएसटी:सध्या मुंबईत आणि मेट्रो सिटीमध्ये घरांच्या किमतीवर पाच टक्के जीएसटी आकारला जातो. मात्र मुंबई शहराच्या बाहेर याच घरांच्या किमतीवर केवळ एक टक्का जीएसटी लावण्यात येतो. त्यामुळे मुंबईसारख्या शहरात नागरिकांचे जवळपास चार टक्के पैसे अधिकचे जातात. जर हा जीएसटी अर्थमंत्र्यांनी कमी केला आणि तो एक टक्क्यावर आणला तर घरांच्या किमती कमी होतील. परवडणारी घर मुंबईसारख्या शहरात लोकांना मिळायला अजून मदत होईल, त्यामुळे अर्थमंत्र्यांनी यंदाच्या बजेटमध्ये जीएसटी कमी केल्यास त्याचा या क्षेत्राला चांगला फायदा होईल, असे राजेंद्र सावंत यांचे मत आहे.
सिमेंटची आयात सुरू व्हावी:सध्या परदेशातून येणाऱ्या सिमेंटची आयात पूर्णपणे बंद आहे. याचा मोठा फटका बांधकाम क्षेत्राला बसत आहे. त्यामुळे सादर होणाऱ्या या बजेटमधून विदेशातून येणाऱ्या सिमेंटची आयात करण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा मोठा फायदा बांधकाम क्षेत्राला होईल. सध्या देशात सिमेंटचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे घर तयार करत असताना आपोआपच घरांच्या किंमती वाढत आहेत.