मुंबई :सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सत्ता संघर्षाच्या निकालानंतर राज्यातील शिंदे फडणवीस सरकार स्थिर राहणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आता राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला कोणतीही अडचण राहिलेली नाही. निकाल लागल्यानंतर लगेचच मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी चर्चा होती. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे मुंबई आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेल्यानंतर या घडामोडींना आता वेग आला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अचानक दिल्लीवारी :सत्ता संघर्षाच्या निकालानंतर आपल्या सरकारला कोणताही धोका नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर आपण समाधानी असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. त्यामुळे राज्यातील सरकार आता स्थिर असून मंत्रिमंडळ विस्ताराला कोणतीही अडचण येणार नाही असे संकेतही त्यांनी दिले होते. दरम्यान उपमुख्यमंत्री नागपूर दौऱ्यावर असताना अचानक शुक्रवारी रात्री दिल्ली दरबारी पोहोचले. रात्रीच्या बैठकीनंतर ते पुन्हा नागपुरात परतले आहेत. मात्र या घडामोडी आणि बैठकांमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात होण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.
आमदार बच्चू कडू यांनी दिले संकेत :आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तार होण्याचे संकेत नुकतेच दिले होते. आता राज्यातील सरकारला कोणताही धोका नाही, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरू झाली आहे. कदाचित 21 मे रोजी मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो अशी शक्यता बच्चू कडू यांनी वर्तवली होती. आमदार बच्चू कडू हे प्रहार पक्षाचे नेते असून त्यांनी शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यांच्याच आग्रहानुसार राज्यात नवीन दिव्यांग मंत्रालय सुरू करण्यात आले आहे. बच्चू कडू यांना दिव्यांग मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाईल अशी शक्यता वाटत असताना त्यांना मंत्रिपद दिले गेले नव्हते. मात्र आता नव्या मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांच्याकडे दिव्यांग मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.
काय आहे विस्ताराची तारीख :मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख बच्चू कडू यांनी जरी 21 मे सांगितले होते. मात्र 21 मे रोजी मंत्रिमंडळ विस्तार न होता, तो आता पुढील आठवड्यात होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पुढील आठवड्यातील 23 किंवा 24 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्ताराची नवी तारीख समोर आली असून दोन्ही पक्षातील इच्छुकांनी मंत्रीपदासाठी जोरदार लॉबिग करायला सुरुवात केली आहे.