मुंबई - विधानसभा निवडणूक निकालानंतर अद्भूत अशा राजकीय घडामोडीने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार विराजमान झाले असले, तरी महिनाभरापासून मंत्रिमंडळाचा विस्तार प्रलंबित होता. मात्र, महिनाभरापासून रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मूहुर्त अखेर निघाला असून ३० डिसेंबर रोजी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या 36 आमदारांना मंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. तसेच अन्य आमदारांची नाराजी वाढू नये म्हणून तीनही पक्षातील काही जागा रिकाम्या ठेवूनच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल अशी सूत्रांची माहिती आहे. त्यासाठी युद्धपातळीवर ती विधानभवन परिसरातील मोकळ्या जागेत मंडप उभारणीचे काम सुरू आहे.
हेही वाचा - दिल्ली विधानसभा: काँग्रेसच्या स्क्रीनिंग समितीच्या अध्यक्षपदी राजीव सातव
विधानसभेच्या सदस्यांची संख्या 288 असल्यामुळे 43 मंत्री घेतले जाऊ शकतात. त्यापेक्षा जास्त मंत्र्यांना घेता येत नाही. उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रत्येकी दोन अशा एकूण 6 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. उर्वरित 36 मंत्र्यांचा समावेश 30 डिसेंबर रोजी होईल. सोमवारी होणाऱ्या शपथविधीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी 10 कॅबिनेट आणि 3राज्यमंत्री तर काँग्रेसचे 8 बिनेट आणि 2 राज्यमंत्री यांना शपथ देण्यात येणार आहे. त्यानुसार तयारी चालू असल्याचे राजभवनातील अधिकाऱ्यांनी सांगितले. राजभवनात दरबार हॉलचे काम चालू असल्यामुळे शपथविधी विधानभवन समोरील मोकळ्या जागेत शपथविधी केला जाईल असे राजशिष्ठाचार विभागातील अधिकाऱ्यांची स्पष्ट केले. मंत्रिमंडळ विस्तारासाठी सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती असल्यानेच विधिमंडळ परिसरात मोठी मोकळी जागा शपथविधीसाठी निश्चित करण्यात आली आहे.
राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी या जागेसाठी संमती दिली असून सोमवारी दुपारी एक वाजता हा महाशपथविधी सोहळा पार पडणार आहे. शिवसेनेला 15 मंत्रीपदे व एक मुख्यमंत्रीपद, राष्ट्रवादीला 15 मंत्रीपदे व एक उपमुख्यमंत्रीपद आणि विधानसभेचे उपाध्यक्षपद तर काँग्रेसला 12 मंत्रीपदे आणि विधानसभेचे अध्यक्षपद अशी विभागणी या तीन पक्षात झाली आहे. राष्ट्रवादीच्या बहुसंख्य आमदारांमध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद घ्यावे असा आग्रह सुरू केला आहे. अजित पवार या पदावर असतील तर ते आमदारांना बांधून ठेवू शकतील, त्यांची कामे करू शकतील व पर्यायाने राज्यात पक्ष वाढीसाठी त्यांची मदत होईल असे राष्ट्रवादीच्या काही आमदारांची म्हणने असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देखील अजित पवार सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होतील असे सांगितले होते. ते सरकारमध्ये असणे ही सरकारची गरज असल्याची स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र, शरद पवार यांनी माझ्या पक्षात कोणाला कोणते पद द्यायचे ते मी ठरवेन असे सांगितले होते.