महाराष्ट्र

maharashtra

शुक्रवारी होणार मंत्रीमंडळ विस्तार ?; मुख्यमंत्र्यांसोबत विखे-पाटील, मोहिते-पाटील, सत्तारांची चर्चा

By

Published : Jun 11, 2019, 6:11 PM IST

Updated : Jun 11, 2019, 6:59 PM IST

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसत असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडून भाजपमध्ये सामील झालेले आणि भाजपच्या वाटेवर असलेले नेते यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राधाकृष्ण विखे-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, कालिदास कोळंबकर आणि अब्दुल सत्तार यांनी जवळ-जवळ अर्धा तास मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.

येत्या 14 जूनला मंत्री मंडळ विस्तार

मुंबई - पावसाळा अधिवेशनाच्या आधी राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले होते. त्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात भाजपच्या वाटेवर असलेले विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार अब्दुल सत्तार, कालिदास कोळंबकर यांची बैठक झाली. या आठवड्यातच या नेत्यांचा भाजप प्रवेश आणि १४ जूनला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजनही उपस्थित होते.

येत्या 14 जूनला मंत्री मंडळ विस्तार

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसत असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडून भाजपमध्ये सामील झालेले आणि भाजपच्या वाटेवर असलेले नेते यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राधाकृष्ण विखे-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, कालिदास कोळंबकर आणि अब्दुल सत्तार यांनी जवळ-जवळ अर्धा तास मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या नेत्यांच्या राजकीय पुनर्वसनाबाबत यावेळी चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारात राधाकृष्ण विखे-पाटील यांचे नाव निश्चित मानले जात आहे. तर कालिदास कोळंबकर यांचा वडाळा मतदारसंघ सध्या शिवसेनेकडे असल्याने त्यांना पुन्हा त्याच मतदारसंघातून निवडणूक लढवता येईल का? तसेच अब्दुल सत्तार यांना स्थानिक नेत्यांनी भाजपमध्ये घेण्यास विरोध दर्शवला आहे, या मुद्यांवर ही या बैठकीत चर्चा झाली.

मंत्रिमंडळात सात विभाग रिक्त असून अनेक विभाग अन्य मंत्र्यांकडे वर्ग करण्यात आले आहेत. आमदार गिरीश बापट लोकसभेवर गेल्याने त्यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा हे खाते देखील पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे देण्यात आले आहे. दिवंगत भाजप नेते पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर कृषी विभाग ही महसूल मंत्री चंद्रकांत-पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. आता मंत्रिमंडळ विस्तारात कृषी विभाग राधाकृष्ण विखे-पाटील यांना देण्यात येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भात विखे-पाटील यांना विचारणा केली असता, विस्तार करणे हा मुख्यमंत्र्यांच्या अधिकाराचा विषय आहे. मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया विखे-पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर दिली. तसेच निळवंडे कालव्याच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न सोडवला असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनकडील आरोग्य खातेही सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले जयदत्त क्षीरसागर यांच्या गळ्यात आरोग्य मंत्रिपदाची माळ पडणार असल्याचेही राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सोबत भाजपच्या सुकाणू समितीची नुकतीच बैठक झाल्याने मंत्रिमंडळ विस्तार करण्याबाबत चर्चा झाली असल्याने विस्ताराच्या चर्चेला पुष्टी मिळत आहे. शहा यांच्या बैठकीत भाजप नेत्यांच्या नावाचीही चर्चा झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, आमदार संजय कुटे, अतुल सावे, प्रशांत बंब यांनाही विस्तारात संधी मिळणार असल्याचेही सांगितले जात आहे.

Last Updated : Jun 11, 2019, 6:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details