महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भारतीय राजकारणातील झंझावाती व्यक्तिमत्त्व हरपले- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सुषमा स्वराज या भारतीय राजकारणातील एक खंबीर नेतृत्व होत्या. गेल्या ५० वर्षांच्या राजकीय वाटचालीत त्यांनी संसदीय राजकारणात स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळातील विविध विभागांचा कार्यभार त्यांनी जबाबदारीने सांभाळला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

श्रीमती सुषमा स्वराज

By

Published : Aug 7, 2019, 12:44 AM IST

Updated : Aug 7, 2019, 7:17 AM IST

मुंबई- माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक झंझावाती आणि वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व हरपले, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोक संदेशात सांगितले की, श्रीमती स्वराज या भारतीय राजकारणातील एक खंबीर नेतृत्व होत्या. गेल्या ५० वर्षांच्या राजकीय वाटचालीत त्यांनी संसदीय राजकारणात स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळातील विविध विभागांचा कार्यभार त्यांनी जबाबदारीने सांभाळला होता. विशेषत: एका महत्त्वाच्या कालखंडात त्यांनी पाच वर्षे परराष्ट्र मंत्रालयाची महत्त्वाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळली होती. यासोबत अटलजींच्या मंत्रिमंडळातही त्यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण, सूचना आणि प्रसारण मंत्रालय अशा विभागांच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या.

लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद समर्थपणे सांभाळताना आपल्यातल्या निष्णात संसदपटूची प्रचिती आणून दिली होती. अत्यंत तरुण वयात राजकारणात आपला ठसा उमटवणाऱ्या सुषमाजींनी हरियाणाच्या मंत्रिपदासह दिल्लीचे मुख्यमंत्रीपदही भूषविले होते. एक श्रेष्ठ विधिज्ञ, साहित्यप्रेमी, प्रभावी वक्त्या, अभिजात रसिक असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही विशेष पैलू होते. त्यांच्या निधनाने आपण ज्येष्ठ नेत्या आणि मार्गदर्शक गमावल्या आहेतच पण त्यासोबत माझीही वैयक्तिक हानी झाली आहे, असे ते म्हणाले.

  • नितीन गडकरी-सुषमा स्वराज यांच्या निधनाने माझे व्यक्तिगत नुकसान झाले आहे. भाजप पक्षाच्या स्थापनेपासून तर त्याचा वाढीपर्यंत सुषमा स्वराज यांनी मोलाची भूमिका साकारली. मी भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांनी मला मोठ्या बहिणीसारखे मार्गदर्शन केले होते.
  • पंकजा मुंडे- 'फुल नही चिंगारी है ये भारत की नारी है..
    इस नारे को बदल कर
    फुल भी है चिंगारी है ये भारत की नारी है...
    करनेवाली हमारी फुल सी कोमला और चिंगारी सी तेजस्वी नेता आज हमें छोडकर चली गई..
    तीव्र दुःख ओर वेदना का भाव है... शब्द नही मेरे पास ।।।
  • चंद्रकांत पाटील - सुषमा स्वराज यांचे जाणे हे देशाला आणि पक्षाला दोघांनाही चटका लावणारे आहे. त्या इतक्या लवकर जातील, असे कुणालाही वाटले नव्हते. त्यांची नितिमत्ता, कार्यकर्त्यांशी वागण्याची हातोटी असे अनेक गुण त्यांच्यामध्ये होते. त्या अष्टपैलू व्यक्तीमत्व होत्या. पक्ष उंचीवर जात असताना अशा व्यक्तीचे जाणे दुख:दायक आहे.
Last Updated : Aug 7, 2019, 7:17 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details