मुंबई- देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या निकालाबाबत सर्वसामान्य जनतेपासून विविध राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात सांशकता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यापुढे देशातील कोणतीही निवडणूक ईलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिनच्या म्हणजे ईव्हीएम ऐवजी मत पत्रिकेच्या माध्यमातून घेतली जावी, या प्रमुख मागणीसाठी 9 ऑगस्टला देशभरात विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांचे जनआंदोलन छेडले जाणार आहे. राज्यभरात या आंदोलनात तीनशेहून अधिक विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सामाजिक संघटना सहभागी होणार असून या आंदोलनाला आता राजकीय पाठबळही मिळत असल्याचे चित्र समोर आले आहे.
ईव्हीएम विरोधात देशभरातील विविध सामाजिक संघटनांनी 9 ऑगस्टला देशव्यापी आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातही प्रमुख विरोधी पक्षांसह सुमारे 300 विविध संघटना आंदोलनाच्या माध्यमातून ईव्हीएमला विरोध करणार असल्याची माहिती, या जन आंदोलनाचे निमंत्रक व दोस्त संघटनेचे अध्यक्ष रवी भिलाणे यांनी दिली.
जन आंदोलनाचे निमंत्रक व दोस्त संघटनेचे अध्यक्ष रवी भिलाणे माहिती देताना... ईव्हीएममध्ये गैरप्रकार होत असल्यामुळे यापुढील निवडणूका मत पत्रिकेच्या माध्यमातूनच घ्यावी, अशी देशभरातील विरोधी पक्षांची मागणी आहे. दरम्यान, ईव्हीएममध्ये फेरफार होत असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेल्या आहेत. तसेच विविध ठिकाणी जनआंदोलने देखील करण्यात आली आहेत. याचाच एक भाग म्हणून येत्या 9 ऑगस्ट रोजी 'भारत छोडो दिनाचे' औचित्य साधून हे आंदोलन छेडण्यात येणार आहे.
मुंबईत या जन आंदोलनाच्या माध्यमातून क्रांती मैदान ते चैत्यभूमी असा मुंबईत लाँग मार्च काढण्यात येणार आहे. यामध्ये आम आदमी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित विकास आघाडी या राजकीय पक्षांसह विविध छोटे पक्ष सहभागी होणार आहेत. तसेच शेतकरी संघटना, श्रमिक मुक्ती दल, मजदूर किसान एकता दल आदिवासी लोकसंघर्ष मोर्चा, ठाणे मतदार अभियान, अनहद संघटना, भारत बचाव आंदोलन यासह 300 संघटना सामील होणार आहेत. यावेळी ईव्हीएमच्या प्रतिकृतीचे दहन केले जाणार आहे. तसेच ईव्हीएमला विरोध करण्यासाठी www.evmhatao.org हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी यावर संपर्क साधण्याचे आवाहन आपचे दिनेश शिंदे, तसेच रवी भिलाणे यांनी केले आहे.