मुंबई:गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांकडून राज्यातील कायदा-सुव्यवस्थे बाबतचा आढावा घेतला. भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या वक्तव्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय का? याबाबत या बैठकीत आढावा घेतला गेल्याचे सांगण्यात येत आहे.
लाऊड स्पीकर संदर्भात न्यायालयाने मर्यादा घालून दिल्या आहेत. त्या मर्यादांचे सर्वांनीच पालन केले पाहिजे. रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत कोणीही लाऊड स्पीकर लावू नये असे न्यायालयाचे निर्देश आहेत. तसेच हनुमान जयंती साजरी करण्यासाठी कोणावर ही हरकत नाही. शिवसेनेने पण हनुमान जयंती साजरी केली असे स्पष्टीकरण भेटीनंतर बोलताना गृहमंत्र्यांनी दिले आहे. तसेच राणा दाम्पत्यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचण्याचा इशारा दिला होता. त्यावर बोलताना गृहमंत्री म्हणाले की, ज्यांना हनुमान चालीसा वाचायची आहे त्यांनी मंदिरात जाऊन वाचावी.
मशीदी समोर हनुमान चालीसा लावण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वक्तव्य केले. त्यातच भाजपच्या नेत्यांकडून मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्यासाठी लाऊड स्पीकर मोफत वाटले जातात. तसेच राज्य सरकार सर्व मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला आहे. यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याबाबतची चर्चा या बैठकीत झाल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाली. तसेच या प्रकरणात आरोपी असलेले एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात राज्य सरकार कडून न्यायालयात मांडण्यात येणाऱ्या भूमिकेबाबतही यावेळी चर्चा झाली. तसेच सदावर्ते यांची पत्नी जयश्री पाटील यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. हल्ला करणाऱ्यांपैकी काही जण मद्यपान करून आली असल्याची माहिती मिळाल्याचेही गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा : Hanuman Chalisa Controversy : हनुमान चालीसावरून राज्यातील राजकारण ढवळले; पाहा, दिवसभरात काय घडलं?