मुंबई : मुंबईसह इतर शहरांत स्वतःचं घर घेणे हे प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं स्वप्न असते. त्यासाठी काटकसर, पदरमोड, पै-पै जमवत, कधी-कधी कर्ज काढून घर घेण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, बिल्डरांकडून अनेकांची फसवणूक केली जाते. याबाबत तक्रारी वाढल्यानंतर बांधकाम व्यवसायात पारदर्शकता यावी आणि बिल्डरांकडून ग्राहकांची होणारी फसवणूक थांबावी, यासाठी (२०१७)मध्ये महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेशन ऍक्ट म्हणजेच महारेराची स्थापना करण्यात आली आहे.
महारेराच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक : राज्यातील सर्व बांधकाम प्रकल्प महारेराच्या एकाच छताखाली आलेत. ऑनलाइन पद्धतीने महारेराचे कामकाज सुरू झाले. महारेरा कायद्यातील कडक नियमाने बिल्डरांना चाप लागेल आणि ग्राहकांना संरक्षण मिळेल, असा दावा करण्यात आला होता. मात्र, अल्पावधीतच हा दावा फोल ठरला आहे. सध्या बिल्डरांकडून महारेराच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.
महारेरा नियमांचे उल्लघंन :राज्यासह मुंबईत राज्यात बिल्डरांकरून मोठ्या प्रमाणात गृह प्रकल्प उभे राहत आहेत. बिल्डरांकडून या प्रकल्पांची मोठ्या प्रमाणात जाहिरात करताना, महारेराचे सर्व नियम यावेळी पायदळी तुडवले जात आहेत. मागील तीन महिन्यात अठरा हजारहून अधिक बिल्डरांनी महारेरा नोंदणीच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक केली आहे. चुकीच्या पद्धतीने जाहिरातींचा यात वापर करण्यात आला आहे. महारेराकडे याबाबत तक्रार आल्यानंतरही कारवाई झाली नाही.
राज्य सरकारने कोणत्या उपाययोजना केल्या ? : सध्या तक्रारीचा ओघ वाढल्यानंतर महारेरा प्रशासनाने दोन हजार बिल्डरांना (११ जानेवारी २०२३)ला नोटीस बजावल्याची बाब ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी निदर्शनास आणून दिलीये. तसेच, महारेराच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बिल्डरांविरोधात कोणती कारवाई करण्यात आलीये. गृहनिर्माण प्रकल्पाची माहिती अद्यावत करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या उपाययोजना केल्या, याबाबत माहिती द्यावी अशी मागणीही करण्यात आली आहे.