मुंबई Ethanol Production : इथेनॉल निर्मितीबाबत केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सोमवार, १८ डिसेंबरपासून इथेनॉल निर्मिती करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. या निर्णयाचे स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) 'एक्स'वरुन पोस्ट करत, केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निर्णयामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकार तसेच केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह (Union Minister Amit Shah) यांचे मनापासून आभार मानतो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
निर्णयामुळं साखर कारखान्यांना दिलासा :पुढे मुख्यमंत्र्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की, साखर उत्पादन आणि ऊसापासून तयार होणाऱ्या अन्य उपउत्पादनांच्या निर्मितीमध्ये समतोल राखण्यासाठी केंद्राने काही दिवसांपूर्वी निर्बंध आणले होते. त्यावर राज्यातील ऊस उपलब्धता व साखर उत्पादन याबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली होती. त्यांनी वस्तूस्थिती समजून घेत तत्काळ प्रतिसाद दिला. यामुळे साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मिती करता येणार आहे. तसेच केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं साखर कारखान्यांना दिलासा मिळणार आहे.