मुंबई- घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर असा प्रवास करताना अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. ये जा करण्यासाठी बेस्ट बसेसची व्यवस्था केली गेली आहे. या बसेसच वेळापत्रकानुसार धावत नसल्याने कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. मंगळवारी वडाळा आगाराबाहेर सुमारे दोन तास त्यांना ताटकळत उभे राहावे लागले. यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. कामाचा ताण आणि घरी पोचण्यासाठी लागणारा वेळ यामुळे कर्मचारी रडकुंडीला आले होते.
अत्यावश्यक सेवेतील अनेक कर्मचारी विरार आणि बोरीवली येथून प्रवास करतात. यासाठी पहाटे 4 वाजता घर सोडतात. बसेस वेळेवर नसल्याने कार्यालयात पोहचण्यासाठी 4.30 तास वेळ लागतो. येताना ही तेवढाच वेळ लागत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास होत आहे. मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. 2 तासापासून वडाळा डेपो येथे प्रतीक्षा करून सुद्धा बस न आल्याने कर्मचाऱ्यांनी गोंधळ घातला. त्यानंतर बस सोडण्यात आली. आम्ही आमचा जीव धोक्यात घालून काम करत आहोत परंतु आम्हाला ये जा करण्यासाठी असणारी व्यवस्था सुधारावी, जादा बसेस सोडाव्यात, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.