मुंबई -राज्य सरकारच्या निर्देशानुसार रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलिसांच्या वतीने स्थानकात कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच नव्या नियमांनुसार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाा रांगा लावून ओळखपत्र बघूनच रेल्वे स्थानकांवर प्रवेश देण्यात येत आहे. तरी सुद्धा पाकीटमारी आणि मोबाइल चोरीच्या घटनेत काही कमतरता आलेली नाही. उलट पहिल्याच दिवशी रेल्वेत आणि रेल्वे परिसरातून ११ चोरीच्या घटना घडल्या आहे. परिणामी एकीकडे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रांगेचा जाच आहे, तर दुसरीकडे चोरांची धास्ती आहे.
चोरांची भीती व सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा -
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सर्वसामन्य मुंबईकरांसाठी लोकलचे दार बंद केले आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासात मुभा दिली आहे. तसेच नियमांच्या कडक अंमलबजावणीसाठी रेल्वे स्थानकांवर पोलिसांचा मोठा फौज फाट तैनात केला आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकांवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रांगा लावून ओळखपत्र बघूनच रेल्वे स्थानकात प्रवेश देण्यात येत आहे. त्यामुळे या रांगेत मोठ्या प्रमाणात सोशल डिस्टंसिग फज्जा उडतो आहे. इतकेच नव्हे तर या रांगेत चोरी होण्याची सुद्धा शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र यावर सुरक्षा यंत्रणेवरून दुर्लक्ष करत असल्याने पहिल्याच दिवशी मुंबई विभागात चोरीच्या ११ घटना घडल्या आहेत. यात एकूण ९ मोबाईल चोरीला गेले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थिती केले आहे.
दोन दिवसांत २६ गुन्हे -
फक्त शासकीय आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु आहे. मात्र गेल्या दोन दिवसांत मुंबईतील रेल्वे गाड्या आणि रेल्वे परिसरात एकूण चोरीच्या २६ घटना घडल्या आहे. ज्यात मोबाइल चोरी, बॅग चोरी, पाकीट चोरी, पर्स चोरी, जबरीने मंगळसूत्र चोरी यासारख्या घटना घडल्या आहेत. या २६ चोरीच्या घटनांपैकी १५ घटना या मोबाईल चोरीच्या आहेत.
३१ हजार ५८६ गुन्हे घडले -
लॉकडाऊनपूर्वी २०१९-२० या एका वर्षात मुंबई रेल्वे पोलीस हद्दीत चोरीचे ३१ हजार ५८६ गुन्हे घडले. त्यापैकी फक्त ३ हजार ३७४ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. याचाच अर्थ उरलेल्या २८ हजार २१२ प्रकरणांमध्ये अद्याप चोरीचा छडा लावण्यात आलेला नाही. मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून त्याचा तपास लावताना मुंबई लोहमार्ग पोलिसही निरनिराळ्या युक्त्या लढवत आहेत. मात्र तरी सुद्धा लोहमार्ग पोलिसांना मोबाइल चोरट्यांच्या मुसक्या आवळता आल्या नाहीत. कोरोनामुळे रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा वाढवली आहे. तरी सुद्धा चोरीच्या घटना थांबल्या नाहीत.
काय काळजी घ्याल?