मुंबई -देशात कोरोनाची दुसरी लाट सुरु असून दिवसाला 4 लाखांपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. अशावेळी आरोग्य सुविधा आणि आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यातही ऑक्सिजन मिळत नसल्याने रुग्णांचा तडफडून मृत्यू होत असल्याचे चित्र आहे. असे असताना देशाची आर्थिक राजधानी असलेल्या आणि कोरोना हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत मात्र कुठेही ऑक्सिजनची टंचाई नसल्याचे पुढे आले आहे. मुंबईतील सर्व रुग्णालयात आणि कोविड सेंटरमध्ये मुबलक ऑक्सिजन साठा उपलब्ध आहे. त्यामुळे ऑक्सिजन अभावी कोणाचा मृत्यू झाल्याच्या घटना नाही. महत्त्वाचे म्हणजे मुंबईतील सर्व जम्बो कोविड सेंटर ऑक्सिजन सुविधेने सज्ज असून मुबलक साठा येथे उपलब्ध आहे. मुंबईतील कोविड सेंटरचा रियालिटी चेक 'ईटीव्ही भारत'ने घेतला असता ऑक्सिजनची कोणतीही टंचाई या सेंटरवर नसल्याचे दिसून आले आहे.
मुंबईत दिवसाला लागतो 235 मेट्रिक टन ऑक्सिजन
कोरोना हा फुफ्फुसाचा आजार आहे. त्यामुळे फुफ्फुसात संसर्ग वाढून रुग्ण गंभीर झाल्यास त्याला कृत्रिम ऑक्सिजन लागते. त्यानुसार आज दिवसाला देशात 4 लाखांपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळत आहेत. तर आजच्या घडीला 36 लाखांपेक्षा अधिक रुग्ण सक्रिय आहेत. या सक्रिय रुग्णांपैकी 10 टक्के रुग्णांना ऑक्सिजन लागत आहे. हा आकडा खूपच मोठा असल्याने उपलब्ध साठ्यापेक्षा कित्येक पट्टीने ऑक्सिजन लागत आहे. ऑक्सिजनची मागणी पूर्ण होत नसल्याने अनेक रुग्ण दगावत आहेत. असे असताना मुंबईत मात्र ऑक्सिजनची कोणतीही टंचाई नाही. मुंबईत मुबलक साठा उपलब्ध आहे. तिसऱ्या लाटेत ऑक्सिजन कमी पडू नये यासाठी आतापासूनच पुरवठा वाढवण्यासाठी विविध माध्यमातून उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे. तर सध्या मुंबईत दिवसाला 235 मेट्रिक टन ऑक्सिजन लागते. ही सर्व मागणी पालिकेकडून पूर्ण केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
ऑक्सिजनच्या नियोजनाचे सर्वोच्च न्यायालयाकडून कौतुक
काही दिवसापूर्वी काही रुग्णालयात ऑक्सिजन नसल्याने 168 रुग्णांना वेळेत ऑक्सिजन असलेल्या रुग्णालयात, कोविड सेंटरमध्ये हलवले आणि त्यांचा जीव वाचवला. त्यानंतर गरजेनुसार सर्व रुग्णालयांना आणि कोविड सेंटरला ऑक्सिजन उपलब्ध करून दिले. कोणत्या रुग्णालयाला, सेंटरला उद्या किती साठा लागू शकतो याची माहिती घेत त्यानुसार दुसऱ्या दिवशी तितका साठा उपलब्ध करुन दिला जातो. ऑक्सिजनच्या विचारणाचे आणि वापराचे योग्य नियोजन केले जाते. यासाठी पालिकेने 6 नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. त्यामुळे हे नियोजन आणखी योग्य होताना दिसत आहे. देशात ऑक्सिजनची इतकी भयानक परिस्थिती असताना मुंबईत मात्र योग्य नियोजन केले जात असल्याने देशभर या नियोजनाचे कौतुक होताना दिसत आहे. अगदी सर्वोच्च न्यायालयाने मुंबईतील ऑक्सिजनच्या नियोजनाचे कौतुक करत दिल्लीचे कान टोचले आहेत.
या कोविड सेंटरमध्ये पुरेसा साठा
मुंबईत ऑक्सिजनची टंचाई नाही, मुंबईच्या ऑक्सिजनच्या नियोजनाचे सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केले आहे. पण प्रत्यक्षात मुंबईतल्या कोविड सेंटरमध्ये काय परिस्थिती आहे, खरच ऑक्सिजनचा मुबलक साठा उपलब्ध आहे का? याचा रियल्टी चेक 'ईटीव्ही भारत'ने केला असता मुंबईतील जम्बो कोविड सेंटरमध्ये समाधानकारक परिस्थिती दिसून आली आहे.