मुंबई - राजधानी मुंबईचे फुफ्फुस अशी ओळख असलेल्या आरे जंगलाचा विकासाच्या नावाखाली नाश करण्याचा डाव आखण्यात आल्याचे म्हणत पर्यावरणप्रेमींनी 'सेव्ह आरे' चळवळ सुरू केली. आज या चळवळीला मोठे यश मिळाले आहे. आरेतील 600 एकर जागा वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर सेव्ह आरेचे कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी आणि आदिवासी आनंदी आहेत. मात्र, जोपर्यंत आरेचे संपूर्ण 3 हजार एकरचे क्षेत्र संरक्षित म्हणून घोषित होत नाही तोपर्यंत 'सेव्ह आरे'चा लढा सुरूच राहील, अशी भूमिका आता सेव्ह आरे ग्रुपने घेतली आहे.
मुंबईत गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे. या विकासासाठी झाडे, उद्यान, मोकळ्या जागांचा ऱ्हास करण्यात आला. आता मुंबईत तितक्याशा मोकळ्या जागा नसल्याने सरकारी यंत्रणांनी आपला मोर्चा आरेकडे वळवला आहे. आरेतील मोकळ्या जागेवर बिल्डरांचाही डोळा आहे. सध्या मुंबईत हे एकमेव जंगल असून हे जर नष्ट झाले तर मुंबईला पुराचा धोका निर्माण होणार आहे. सोबतच पर्यावरणाचे अनेक प्रश्न निर्माण होणार असल्याचे म्हणत मुंबईतील पर्यावरणप्रेमी आणि आदिवासी एकत्र आले. त्यांनी 'सेव्ह आरे' ही चळवळ उभारली. जनजागृती करत त्यांनी चळवळ व्यापक केली.