मुंबई- कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ प्रकल्पाचे कारशेड आरेतून कांजूरमार्गला हलवण्यात आल्याने पर्यावरणप्रेमी आणि सेव्ह आरेचे सदस्य आनंदात आहेत. मात्र, दुसरीकडे त्याचवेळी कांजूरला कारशेड नेल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होणार असून प्रकल्पाला मोठा विलंब होणार असल्याचे म्हणत अनेक आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांकडून केले जात आहे. यामुळे पर्यावरणप्रेमी आता आक्रमकही झाले आहेत. त्यातूनच आता पर्यावरणप्रेमींनी फडणवीसांविरोधात दंड थोपटत त्यांना चर्चेसाठी खुले आव्हान दिले आहे.
सार्वजनिक बैठकीच्या माध्यमातून फडणवीस आणि त्यांच्या सहकार्यांनी आमच्याशी चर्चा करावी. या चर्चेत दूध का दूध, पानी का पानी होईल, आणि सत्य का ते समोर येईल, असे म्हणत पर्यावरण प्रेमींनी फडणवीस यांना पत्र, मेल, फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅप करत चॅलेंज दिले आहे. २०१५ मध्ये एका समितीने मेट्रो-३ चे कारशेड कांजूरमध्ये हलवण्यात यावे, अशी शिफारस केली होती. पण, त्यावेळी मुख्यमंत्री या नात्याने फडणवीस यांनी ही शिफारस फेटाळून लावत, आरेत कारशेड बांधण्याचा निर्णय घेतल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप आहे. मुळात कारशेडवरून, आरेवरून पर्यावरण प्रेमी विरुद्ध भाजपा असा वाद पाहायला मिळत आहे. तर, कांजूरमध्ये कारशेड हलवल्यानंतर हा वाद आणखी पेटला आहे.