महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Rains ...तर मुंबईत महाप्रलय येईल, कोस्टल रोडवरून पर्यावरणप्रेमींचा इशारा - कोस्टल रोड ब्रेकिंग न्यूज

'मुंबई किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर भराव टाकून कोस्टल रोड उभारण्यात येत आहे. या कोस्टल रोडमुळे मुंबईत पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भराव न टाकता पिलरवर बांधकाम करावे. अन्यथा मुंबईत महाप्रलय येईल. आज तर पहिल्या पावसातच मुंबईची तुंबई झाली आहे. याला कोस्टल रोड प्रकल्पच कारणीभूत आहे', असे पर्यावरणप्रेमी स्टॅलिन दयानंद यांनी म्हटले आहे.

mumbai
mumbai

By

Published : Jun 9, 2021, 4:45 PM IST

मुंबई - 'मुंबई किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर भराव टाकत बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कोस्टल रोड उभारण्यात येत आहे. या कोस्टल रोडमुळे मुंबईत पूर येईल हे आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत. मागील एक-दोन वर्षांपासून हे खरे ठरत आहे. आज तर पहिल्या पावसातच मुंबईची तुंबई झाली आहे. याला कोस्टल रोड प्रकल्पच कारणीभूत आहे', असा आरोप पर्यावरणप्रेमी स्टॅलिन दयानंद यांनी केला आहे.

'भराव काढून पिलरवर रस्ता बांधा'

'भराव्यामुळे पावसाचे पाणी गिरगाव चौपाटी, दादर, माहीम, वांद्रे या भागात साचत आहे. अजून या प्रकल्पात भराव होणे बाकी आहे. तो झाल्यास मुंबई बुडेल. त्यामुळे भराव काढून पिलरवर रस्त्याचे बांधकाम करावे', अशी मागणीही स्टॅलिन यांनी लावून धरली आहे.

असा आहे कोस्टल रोड प्रकल्प

दक्षिण मुंबईला पश्चिम उपनगराशी जोडण्यासाठी दक्षिण मुंबईतून कांदिवली-बोरिवलीला जलद पोहोचण्यासाठी आणि मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पालिकेने कोस्टल रोड प्रकल्प हाती घेतला आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. 8 मार्गिकेचा आणि 22.2 किमी लांबीचा असा हा प्रकल्प आहे. यासाठी 1200 कोटी रुपयांहुन अधिक खर्च अपेक्षित आहे. दोन टप्यात या प्रकल्पाचे काम करण्यात येत आहे. यातील पहिला टप्पा प्रिन्सेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते वरळी असा 9.98 किमीचा आहे. तर दुसरा टप्पा वांद्रे ते कांदिवली असा आहे. या प्रकल्पाचे काम पालिकेकडून वेगात सुरू आहे. पण कोरोना-लॉकडाऊन, न्यायालयीन खटले आणि प्रकल्पाला होणारा विरोध पाहता या कामाला विलंब होताना दिसत आहे.

समुद्रात 100 एकरहून अधिक भराव

'समुद्रात भराव टाकून त्यावर रस्ता तयार करण्यात येत आहे. त्यानुसार समुद्रात 100 एकरहून अधिक परसरात भराव टाकला जात आहे. समुद्रात एवढ्या मोठ्या संख्येने भराव टाकणे धोकादायक आहे. यामुळे गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, माहीम किनारा, वांद्रे किनारा या भागाला मोठा फटका बसणार आहे. कारण भराव्यामुळे पावसाचे पाणी समुद्रात जात नाही. ते सखल भागात साचून राहते. त्यामुळेच मागच्या वर्षापासून मुंबईत थोड्या पावसानेही पाणी साचत आहे. अगदी आतापर्यंत चर्चगेट, मंत्रालय आणि दक्षिण मुंबईतील काही परिसरात जिथे आजवर कधीही पाणी साचले नव्हते, तिथेही पाणी साचत आहे. हे कोस्टल रोडमुळेच घडत आहे. येत्या काळात आणखी भराव टाकण्यात येणार आहे. प्रकल्पाचे जसजसे काम पुढे जाईल, तसतशी परिस्थिती आणखी गंभीर होईल. त्यामुळे सरकारने आणि पालिकेने लवकरात लवकर जागे होण्याची गरज आहे', असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.

'...तर मुंबईत महाप्रलय येईल'

'पालिकेने कोस्टल रोड प्रकल्प आणला त्या दिवसापासून या प्रकल्पाला विरोध होत आहे. मच्छिमार व्यवसायावर परिणाम होईल, असे म्हणत मच्छिमार संघटनांनी याला विरोध केला. तसेच, हा प्रकल्पच रद्द करण्याचीही मागणी केली आहे. तर आमच्या वनशक्ती संघटनेनेही याविरोधात याचिका दाखल केली आहे. वनशक्तीने मात्र हा प्रकल्प रद्द न करता भराव काढून पिलरवर बांधकाम करावे, अशी मागणी केली आहे. पण या मागणीकडे सरकार आणि पालिका कानाडोळा करत आहे. याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर मुंबईत महाप्रलय येईल', असा इशाराही स्टॅलिन यांनी दिला आहे.

हेही वाचा -Mumbai Rain Live : पावसाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे रवाना

ABOUT THE AUTHOR

...view details