मुंबई -आरेतील 800 एकर जागा वन म्हणून घोषित झाले आहे. मात्र तेथे अजूनही जंगल-वनसंबंधी नियमांचे पालन होत नाही. आरे जंगलातून पवई-गोरेगाव रस्त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक सुरू आहे. याचा परिणाम जंगलातील प्राण्यांवर होत आहे असे म्हणत आता पर्यावरणप्रेमींनी आरेतील पवई-गोरेगाव रस्ता वाहतूकीसाठी बंद करावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. तर हा रस्ता वाहतूकीसाठी बंद करणे शक्य नसेल तर त्यावर टोल आकारावा, जेणेकरून वाहतूक कमी होईल असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
आरे जंगल..
आरे जंगलात आरे मिल्क कॉलनी विकसित झाल्यानंतर त्यांना वाहतूक करता यावी यासाठी पवई गोरेगाव रस्ता तयार करण्यात आला. तर या वाहतूकीवर पूर्वी अनेक निर्बंध होते. हा रस्ता सरसकट वापरता येत नव्हता. वन्य प्राण्यांचा विचार करता हा रस्ता रात्री 9 वाजता बंद केला जात होता. तर यावर 2010 पर्यंत 30 रुपये दंड आकाराला जात होता अशी माहिती वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी दिली आहे. 2010 नंतर मात्र हा रस्ता मुंबई महानगर पालिकेकडे हस्तांतरीत झाला आणि मग हा रस्ता सर्व जण वापरू लागले. याचा नक्कीच वन्यप्राण्यांवर परिणाम झाला असून आजही होत आहे. हा इको सेन्सिटिव्ह झोन असताना इथे मोठ्या संख्येने वाहतूक असते, वाहतूक कोंडी होते. त्यामुळे आता हा रस्ता बंद करावा अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती स्टॅलिन यांनी दिली आहे.
मागणी काय आहे ?
आरे जंगलातील 800 एकर जागा जंगल म्हणून घोषित झाली आहे. तेव्हा इतर नियमांचेही पालन होणे गरजेचे आहे. हा रस्ता आता वाहतुकीसाठी बंद करणे आवश्यक आहे. त्यामुळेच आम्ही हा रस्ता बंद करण्याची मागणी केली आहे. तर रस्ता पूर्णतः बंद करणे शक्य नसेल तर त्यावर टोल लावावा म्हणजे रस्त्याचा वापर कमी होईल असेही आम्ही सुचवले आहे. तर हा रस्ता रात्री ते सकाळी पूर्ण वेळ कामासाठी बंद असावा असेही आम्ही सरकारसमोर ठेवले आहे, असे ही स्टॅलिन यांनी सांगितले आहे. आता मुख्यमंत्री याला काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे आहे.