मुंबईत - पाऊस पडला आणि मुंबईतील सखल भागात पाणी साचलं नाही असे सहसा होत नाही. मुंबईत सलग 2 तास जरी पाऊस पडला, तरी मुंबईतील सखल भागात पाणी साचते आणि यामध्ये दादर येथील हिंदमाता परिसराचा प्रामुख्याने समावेश असतो. दरवर्षी पालिका प्रशासन हिंदमाताला पाणी साचू नये म्हणून प्रयत्न करते. परंतु, हे प्रयत्न कायम अयशस्वी होतात. यावर्षी या ठिकाणी पाणी साचू नये यासाठी विशेष प्रकल्प राबवला जात असून, याकडे स्वतः पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लक्ष दिले आहे.
'पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे लक्ष'
मुंबईत पावसाळा सुरू झाला की, दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतल्या हिंदमाता परिसरात जलकोंडी पाहायला मिळते. दरवेळी तिथे पूरपरिस्थिती निर्माण होत असून, मोठ्या प्रमाणात पाणी साचते. मात्र, आता मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे हिंदमाता येथील जलकोंडी या पावसाळ्यात फुटणार आहे. हिंदमाता येथील पावसाळ्यातील जलकोंडी फोडण्यासाठी महानगर पालिका भूमिगत टाक्या बांधत असून, या टाक्यांचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या टाक्यांचं काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे. स्वतः आदित्य ठाकरे यांनी या प्रकल्पाची पाहणी केली असून, याचे काम अगदी जोमाने सुरू आहे.