मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-3च्या आरेतील कारशेडच्या कामासाठी आतापर्यंत 400 कोटी खर्च झाला, असून आता हा खर्च वाया गेल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पर्यावरणप्रेमी व सेव्ह आरे यांनी हा दावा फेटाळून लावण्यात आला. पर्यावरणप्रेमींनी अधिकृत कागदपत्रांच्या आधारे याची पोलखोल केली आहे. त्यांना मिळलेल्या कागदपत्रानुसार आरे कारशेडच्या कामासाठी केवळ 69 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली. पर्यावरणप्रेमींनी आता फडणवीस यांना टार्गेट करत 400 कोटींचा आकडा कुठून आणला? हे 400 कोटी कुठे आणि कसे खर्च झाले? याचे उत्तर द्या, अशी मागणी केली आहे.
आरे कारशेडवर केवळ 69 कोटी खर्च! पर्यावरणप्रेमींचा फडणवीसांवर पलटवार
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी आरे मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपाने आता त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पर्यावरणप्रेमींनी मुख्यमंत्र्यांची बाजू घेतली आहे.
आरे कारशेड आता कांजूरमार्गला हलवण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमी-आदिवासी आनंदी झाले असून सर्वसामान्य मुंबईकरांनीही याचे स्वागत केले आहे. असे असताना भाजपाने मात्र, यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. फडणवीस यांनी तर हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी केवळ अहंकारातून घेतल्याची टीका केली. आतापर्यंत आरे कारशेडवर खर्च करण्यात आलेले 400 कोटी पाण्यात जातील, असाही आरोप त्यांनी केला. वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी हे आरोप फेटाळून लावले. आरेमध्ये केवळ एक इमारत उभी करण्यात आली असून 15 टक्के काम झाले आहे. या संपूर्ण कामाची निविदा 350 कोटींची होती. संपूर्ण कामच 350 कोटीचे असेल आणि त्यातही केवळ 15 टक्केच काम पूर्ण झाले असेल तर, मग 400 कोटी खर्च कसा झाला? असा प्रश्नही स्टॅलिन यांनी फडणवीसांना विचारला आहे. निविदेपेक्षा अधिक काम झाले असेल तर, याची चौकशीही होणे गरजेचे आहे, असे म्हणत स्टॅलिन यांनी फडणवीसांना लक्ष्य केले आहे.
पर्यावरणप्रेमी आणि भाजपा-फडणवीस यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता आपल्या हाती अधिकृत कागदपत्रे लागल्याचा दावा स्टॅलिन यांनी केला आहे. या कागदपत्राद्वारे आरे कारशेडच्या कामासाठी आत्तापर्यंत केवळ 69 कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे स्टॅलिन यांनी सांगितले. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सत्य आम्ही मुंबईकरांसमोर मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 69 कोटी रुपये खर्च झालेला असताना जबाबदार लोकप्रतिनिधीने 400 कोटी खर्च झाल्याची खोटी माहिती का द्यावी? असा सवाल करत फडणवीसांनी याचे उत्तर द्यावे, अशी मागणीही स्टॅलिन यांनी केली.