मुंबई - आर्थिक डबघाईला आलेल्या येस बँकेचे माजी संस्थापक राणा कपूर यांना ईडीकडून आज (रविवारी) पहाटे 3 वाजता अटक करण्यात आली.मनी लाँडरिंग संदर्भात राणा कपूर यांच्या मुंबईतील वरळीमधील घरावर ईडीने शुक्रवारी रात्री उशिरा धाड मारली होती. यामध्ये राणा कपूर यांच्या घरातून काही महत्वाची कागदपत्रे ईडीच्या हाती लागल्यानंतर ईडी च्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दुपारी 12 च्या दरम्यान राणा कपूर यांना चौकाशीसाठी ईडी कार्यालयात आणले होते. ईडी चौकशीत राणा कपूर सहकार्य करत नसल्याने आज पहाटे ईडीच्या अधिकाऱ्यांनी राणा कपूर यांना अटक केली आहे. त्यानंतर आज न्यायालयात हजर केले असता, त्यांना 11 मार्चपर्यंत ईडीची कोठडी देण्यात आली आहे.
ईडीकडून येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अटक, 11 मार्चपर्यंत ईडीची कोठडी
आर्थिक डबघाईला आलेल्या येस बँकेचे माजी संस्थापक राणा कपूर यांना ईडीकडून आज (रविवारी) पहाटे 3 वाजता अटक करण्यात आली. चौकशीत राणा कपूर सहकार्य करत नसल्याने आज पहाटे ईडीच्या अधिकाऱ्यांनी राणा कपूर यांना अटक केली. त्यांना 11 मार्चपर्यंत ईडीची कोठडी देण्यात आली आहे.
मी ईडीला पूर्णपणे सहकार्य करत असल्याचे राणा कपूर यांनी सांगितले. डीएचएफएल ही कंपनी पूर्णपणे ट्रिपल ए रेटेड असल्याचे ते म्हणाले. तसेच मला ईडीने वैद्यकीय तपासणीसाठी 2 रुग्णालयात नेले आहे. मला आरोग्याच्या समस्या असल्याचेही त्यांनी सांगितले. ईडीने सांगितलेल्या 7 कागदपत्रांवर मी स्वाक्षरी केली आहे. डिएचएफएलने त्यांच्या काम करीत असलेल्या संपत्तीवर कर्ज दिले असल्याचेही कपूर यांनी न्यायालयात सांगितले.
तब्बल 20 तास चाललेल्या या चौकशीत ईडीला महत्वाची माहिती मिळाली आहे. राणा कपूर यांच्या बँकेकडून कॉर्पोरेट क्षेत्रातील मोठ्या कंपनीना हजारो कोटी रुपये कर्ज देण्यात आले होते. यानंतर राणा कपूर यांच्या कुटुंबातील काही सदस्यांच्या बँक खात्यात अचानक मोठ्या रकमा जमा करण्यात आल्या होत्या. यात राणा कपूर यांच्या पत्नीच्या बँक अकाऊंट खात्यातही पैसे जमा झाले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, राणा कपूर यांच्या कुटुंबातील काही सदस्यांच्या बँक खात्यात 600 कोटींहून अधिक रक्कम जमा झाली होती . ही रक्कम डीएचएफएल सारख्या कर्ज बुडवणाऱ्या कंपनीकडून देण्यात आली होती. दरम्यान, राणा कपूर यांच्या अटकेनंतर त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे.