मुंबई -तब्बल 30 तासाहून अधिक वेळ येस बँकेचे सीईओ राणा कपूर यांची ईडीने चौकशी केली. मात्र, ईडीकडून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे राणा कपूर देत नसल्याने ईडीने त्यांना अटक करून न्यायालायत हजर केले. ईडी न्यायालयाने राणा कपूर यांची रवानगी 11 मार्चपर्यंत ईडी कोठडीत केली आहे. याबरोबरच राणा कपूर यांच्या ३ मुली राखी कपूर टंडन, रश्मी कपूर, रोशनी कपूर यांच्यासह पत्नी बिंदू कपूर यांच्या मुंबई आणि दिल्लीतील निवासस्थानी ईडीने छापे मारले आहेत. बिंदू कपूर या सध्याच्या घडीला 18 कंपन्यांच्या संचालक पदावर असून, रोशनी कपूर या 23 तर रश्मी कपूर या 20 कंपनीवर संचालक म्हणून आहेत. या प्रकरणात मनी लाँडरिंग मोठ्या प्रमाणावर केली असल्याचा युक्तिवाद ईडीने न्यायालयात केला.
राणा कपूर यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी दरम्यान काही प्रश्न विचारले, ज्याची योग्य उत्तर देण्यात राणा कपूर यांनी टाळाटाळ केली आहे. या प्रश्नात राणा कपूर यांना विचारण्यात आले की, येस बँकेसोबत तुम्ही कधी पासून कार्यरत आहात? यावर मी स्वत: येस बॅंकेचा फाऊंडर सदस्य आहे. २००४ साली मी आणि माझा भाऊ अशोक कपूर आम्ही दोघांनी मिळून ही बँक सुरू केली असे उत्तर राणा कपूर यांनी दिले. येस बॅंकेच्या कर्ज प्रक्रियेत तुमचा किती सहभाग असतो? या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, विविध कामांकरीता बँकेत मी विविध पातळींवर अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यांना त्याबाबत अधिकार दिले गेले असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा - ईडीकडून येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अटक, 11 मार्चपर्यंत ईडीची कोठडी