मुंबई - जागतिक वातावरणात होणारे बदल लक्षात घेता दरवर्षी मान्सूनपूर्वी चक्रीवादळ येण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर प्रत्येक वर्षीच्या वादळाने कमीतकमी नुकसान व्हावे. वादळ येऊन गेल्यानंतर वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी कायमस्वरूपीची कार्यप्रणाली तयार करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत.
'चक्रीवादळाच्या मुकाबल्यासाठी कायमस्वरूपी एसओपी तयार करा' - Energy Minister Dr. Nitin Raut
प्रत्येक वर्षी येणाऱ्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, कायमस्वरूपीची कर्यप्रणाली तयार करण्याबाबत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक
'तौक्ते' चक्रीवादळ येऊन गेल्यावर वीज यंत्रणांच्या झालेल्या नुकसानीचा आणि मान्सूनपूर्व तयारीचा आढावा ऊर्जामंत्री राऊत यांनी ऑनलाइन माध्यमातून घेतला, यावेळी ते बोलत होते. या बैठकीला ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, सल्लागार उत्तम झाल्टे, महावितरणचे संचालक (ऑपरेशन्स) संजय ताकसांडे हे मंत्रालयातून, तर महावितरणचे सर्व प्रादेशिक संचालक, मुख्य अभियंता आणि महापारेषणचे सर्व मुख्य अभियंता हे व्हीसीद्वारे उपस्थित या बैठकीला उपस्थित होते.
'एसोओपी तयार करा'
गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळ आले, यावर्षी 'तौक्ते' चक्रीवादळ आले. जागतिक वातावरण बदल आणि इतर भौगोलिक कारणामुळे दरवर्षी असे चक्रीवादळ येण्याची शक्यता गृहीत धरावी लागणार आहे. चक्रीवादळाचा इशारा येईल आणि मग आपण नियोजन करू यापेक्षा आता दरवर्षी मान्सूनच्या तोंडावर चक्रीवादळ येणार हे गृहीत धरून नियोजन करा. या वादळामुळे आपले कमीतकमी नुकसान होईल आणि वीज पुरवठा तत्काळ पूर्ववत करता येईल, यासाठी कायमस्वरूपी नियोजन व आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) तयार करा, असे निर्देश राऊत यांनी या बैठकीत दिले.
'कर्मचाऱ्यांचे कौतुक'
पालघरमधील वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या आघाडीवर नेमकी काय प्रगती आहे, याबद्दल त्यांनी आजच्या बैठकीत विशेष चर्चा केली. अधिकाऱ्यांकडून तेथील कामाच्या सध्याच्या परिस्थितीची माहिती घेतली. तसचे, पालघरचे पालकमंत्री दादाजी भुसे यांना दूरध्वनी करून आपण वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामाबाबत समाधानी आहात का अशी विचारणाही त्यांनी केली. भुसे यांनी दिलेल्या सूचनांवर कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. पालघरमध्ये महावितरणकडे झाडे कापण्याची यंत्रे नसल्याच्या तक्रारीवरून त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. 'तौक्ते' वादळ व यापूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळात महावितरण व महापारेषणच्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी चांगले काम केले आहे. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदनही राऊत यांनी केले.
'१५ दिवसांत अहवाल सादर करा'
खंडित झालेला वीज पुरवठा आपण लवकरात लवकर पूर्ववत करतो हे जरी आकडेवारीवरून खरे असले, तरी बऱ्याच ठिकाणी प्रत्येक्ष वेगळी परिस्थिती असते. याबाबत आमदार, खासदार व इतर माहिती अधिकार कार्यकर्ते व पत्रकार आपल्या प्रत्यक्ष हजर असलेल्या अधिकाऱ्यांना फोन व दूरध्वनी करीत असतात, परंतू काही अधिकारी फोनही उचलत नाहीत व दाद देत नाहीत, अशा तक्रारी मला प्राप्त झाल्या आहेत. अशा काही तक्रारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना देत असून, त्यावर चौकशी करून १५ दिवसात अहवाल सादर करावा", असे निर्देशही त्यांनी दिले. तसेच, राज्यात चक्रीवादळ येऊन वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून चक्रीवादळरोधक वीज पायाभूत सुविधा कशा उभारता येतील, याचा अभ्यास सध्या सुरू आहे. या विषयावर केंद्र सरकारसोबत नियमित चर्चा सुरू असल्याचे ऊर्जा सचिव दिनेश वाघमारे यांनी या बैठकीत सांगितले.
'केंद्र सरकारने केले कौतुक'
महाराष्ट्र सरकारने चक्रीवादळानंतर ज्या वेगाने वीज पुरवठा सुरळीत केला, त्याचे कौतुक केंद्रीय ऊर्जा सचिवांनी केले आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या बैठकीत दिली. चक्रीवादळग्रस्त जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत स्वतः गेले दोन-तीन दिवस नियमित संपर्कात होतो, असेही सिंघल यांनी यावेळी सांगितले. तर, महावितरणचे संचालक संजय ताकसांडे यांनी महावितरणने काय केले, याबाबतचे सादरीकरण केले. या चक्रीवादळाचा मुकाबला करण्यासाठी महावितरण, महापारेषण यांच्यासह मुंबईतील बेस्ट, अदाणी, टाटा यांच्यासारख्या संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश असलेला एक गट स्थापन करण्यात आला. याशिवाय २४ तास सक्रिय असलेले एक नियंत्रण कक्ष महावितरणच्या मुख्यालयात स्थापन करण्यात आले. ऑक्सिजन प्रकल्प, रुग्णालये यांचा वीज पुरवठा खंडित होऊ नये याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले, असे ताकसांडे यांनी सांगितले.