मुंबई -मुंबईचे राखणदार इतिहास सांगणाऱ्या किल्ल्यांना अतिक्रमणांचा विळखा ( Encroachments on forts ) पडला आहे. मुंबईतील किल्ल्यांवर प्रेमी युगल, ( Lovers couple on forts in Mumbai ) गर्दुल्ले, तरुणांनी कब्जा केला आहे. यापैकी शिवडी किल्ल्यावर सुरक्षा व्यवस्था नसल्याने पर्यटकांची सुरक्षा वेशीवर टांगली आहे. तर सायन किल्ल्यावर प्रेमी युगलांच्या खुणा दिसून येत आहेत. मात्र, पुरातत्व विभाग, प्रशासनाचा याकडे कानाडोळा केल्याचे ( Neglect of the administration towards the forts ) दिसून येत आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या कबरी परिसरातील अतिक्रमण राज्य सरकारने हटवले. राज्यातील अनेक किल्ल्यांना अतिक्रमणाचा वेढा पडला आहे. मुंबईतील किल्ल्यांची परिस्थिती वेगळी नाही, याबाबत घेतलेला आढावा.
किल्ल्यांना अतिक्रमणांचा विळखा सायन किल्ल्याला प्रेमियुगलांच्या खाणाखुणा -सायन किल्ला माहिम खाडीच्या पूर्वेकडील मुखावरील टेकडीवर इंग्रजांनी सायन किल्ला बांधला. इंग्रजांच्या ताब्यातील मुंबई बेट व पोर्तुगीजांच्या ताब्यातील साष्टी बेट यांच्या सीमेवर(शीवेवर) हा किल्ला १६७० मध्ये जेरॉल्ड आॅगियरने बांधला. सध्या या किल्ल्याच्या संरक्षण तटाचा बुरुज ढासळला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून किल्ल्याची पडझड झाल्याने तो भकास झाल्याचे दिसून आहे. या किल्ल्याची माहिती देणारा फलकही गंजलेल्या स्थितीत आहे. किल्ल्यावर प्रेमी युगुलांपासून गर्दुल्ल्यांपर्यंत अनेक जण येत असतात. यावर कोणतेही नियंत्रण नसते. आजुबाजूच्या झाडीमध्ये दारूपार्ट्याही रंगतात, तर किल्ल्याच्या भिंतीवर प्रेमीयुगलांची नावे कोरण्यात आली आहे. पुरातत्त्व विभागाचा भोंगळ कारभार याला कारणीभूत असल्याची खंत दुर्गप्रेमी व्यक्त करत आहेत.
अतिक्रमणाचा वेढा -मुंबईतील सर्वांत भयावह परिस्थितीत उभा असलेला माहिम किल्ला पाहिला, तर हा किल्ला आहे की झोपडपट्टी, असा प्रश्न कुणाही सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहणार नाही. किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून संपूर्ण किल्ला हा अतिक्रमणांनी व्यापला आहे. अतिक्रमणांचा विळखा इतका व्यापक आहे की, कोणतीही व्यक्ती सरळ मार्गाने किल्ल्यात शिरूच शकत नाही. किल्ल्यांतर्गत दोन ते तीन मजली घरे उभारण्यात आली आहेत. येथील किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात ३ महिन्यांची कैद आणि पाच हजार रुपये दंडाची पाटी शासनाने लावलेली आहे. परंतु, अतिक्रमण रोखण्यास पुरातत्त्व विभागाला अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. वरळी किल्ल्याची स्थिती ही सारखीच आहे. या किल्ल्याला लागूनच बहुतेकांनी घरे उभारली आहेत. किल्ल्यावरील व्यायामशाळेने अर्धा किल्ला गिळंकृत केला आहे. ऐतिहासिकदृष्ट्या पर्यटनासाठी हा किल्ला मोठा वारसा ठरू शकतो. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या वर्गाच्या किल्ल्याची वाताहत झाल्याचे दिसून येते.
शिवडी किल्ल्याची सुरक्षा वाऱ्यावर -मुंबईतील अत्यंत महत्त्वाचे आणि फ्लेमिंगोंचे विहंगम दृश्य बघण्याची सुवर्णसंधी मिळते ते ठिकाण म्हणजे शिवडीचा किल्ला. शिवडी येथील हा किल्ला १५०० शतकात बांधलेला आहे. शिवडी रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर किल्ला गाठण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. किल्ला परिसरात अजूनही ठळकपणे दिसतील असे वा स्थानक परिसरातून माहिती मिळतील असे कोणतेही दिशादर्शक नाहीत. परिसरात गेल्यानंतरही इथे आजूबाजूला किल्ला असल्याच्या कोणत्याही खुणा नाहीत. थोड्याफार डागडुजीव्यतिरिक्त किल्ल्याची परिस्थितीही अनेक वर्षे तशीच आहे. येथील किल्ल्यात मुलांचा क्रिकेटचा डाव रंगलेला असतो. सुरक्षारक्षक नसल्याने एकट्या-दुकट्या महिलेसाठी अत्यंत असुरक्षित ( security of Shivdi Fort is in danger ) अशीच परिस्थिती शिवडी किल्ल्यावर पाहायला मिळत आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत -मुंबईतील किल्ले पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकार किंवा पुरातत्त्व विभागाने प्रयत्न करायला हवेत. येथील अतिक्रमण हटवण्यापूर्वी त्यांची पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे. मुंबईतील किल्ल्यांची माहिती पर्यटक करण्यात येण्यासाठी गाईड असायला हवेत. जेणेकरून किल्ल्यांचा इतिहास सर्व दूर पसरेल, असे पर्यटक असिर खान यांनी सांगितले.