पालघर -शिवसेना आणि भाजपमध्ये युतीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांना AB फॉर्म वाटप करण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांनी सोमवारी माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना विधानसभा उमेदवारीसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून AB फॉर्म दिला असून शर्मा हे नालासोपारा येथून शिवसेनेकडून निवडणूक लढवणार आहेत. आता नालासोपारा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेविरुद्ध बहुजन विकास आघाडी अशी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
हे ही वाचा -अर्जुन खोतकरांना शिवसेनेकडून मिळाला सातव्यांदा एबी फॉर्म
एन्काऊंटर स्पेशलिस्ट अशी ओळख असलेल्या प्रदीप शर्मांनी 4 जुलैला पोलीस दलाचा राजीनामा दिला होता. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. पालघर जिल्ह्यातील वसई-विरार-नालासोपारा भागात वर्चस्व असलेल्या बहुजन विकास आघाडीला शह देण्यासाठी शिवसेनेतर्फे प्रदीप शर्मा यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. सोमवारी उद्धव ठाकरे यांनी प्रदीप शर्मा यांना विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा AB फॉर्म दिला असून त्यांना शिवसेनेतर्फे नालासोपारा मतदारसंघातून अधिकृत उमेदवारी मिळाली आहे.