मुंबई- कोरोनामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकलचे दार बंद असतानाही रेल्वेमध्ये जबरी चोरीच्या घटनांनी अत्यावश्यक सेवेतील रेल्वे प्रवासी हैराण झाले आहे. करी रोड ते सीएसएमटी लोकल प्रवासात अत्यावश्यक सेवेतील प्रवाशावर गर्दुल्याने हल्ला करून त्याच्याकडून जबरीने 15 ग्रॅमची सोन्याची चैन चोरी केली. या घटनेत प्रवाशाला दुखापत झाली आहे. मात्र, या घटनेमुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आरोपीला अटक-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत असणारे विजय वाघधरे हे करीराेड येथे राहतात. नेहमीप्रमाणे कामाला जाण्यासाठी त्यांनी बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास करीराेड स्थानकातून सीएसएमटीकडे जाणारी धिमी लाेकल पकडली. वाघधरे ज्या डब्यात बसले हाेते, त्याच डब्यात ते चार प्रवासी बसले हाेते. मस्जिद स्थानकात डब्यातील गर्दी कमी झाली. मात्र, यादरम्यान विजयवर एक गर्दुल्यासह तीन महिलांची नजर होती. त्यानंतर लाेकल सीएसएमटीच्या दिशेने निघाली असता सिग्नल लागला. त्याचवेळी चोरी करण्याच्या उद्देशाने गर्दूल्यासह तीन महिलांनी हल्ला केला. त्यांच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात वार केले. मारहाण करून 15 ग्रॅमची सोन्याची चैन, पाकिटातील पाच हजार रुपये घेऊन फरार झाले.
लोकल डब्यात सुरक्षा वाढवा-
गेल्या एका वर्षापासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी स्वतःच्या जीवाची काळजी न करता आपली सेवा बजावत आहे. कार्यालयात जाण्यासाठी आम्ही लोकल प्रवास करत आहोत. मात्र लोकल डब्यांमध्ये प्रवासी नसल्याने बरेचशे गर्दुल्ले असतात. तसेच विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र यांच्यावर आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासन आज कुठेतरी कमी दिसून येत आहे. आज आमच्या एका कर्मचाऱ्यांवर गर्दुल्ल्यांने जीवघेणा हल्ला केला आहे. मात्र, या हल्ल्यात तो सुदैवाने बचावला आहे. भविष्यात सुद्धा असे हल्ले होऊन कर्मचाऱ्यांची जीवित हानी होऊ शकते. त्यामुळे आम्ही रेल्वे प्रशासनांना विनंती करतो की, प्रत्येक रेल्वे स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढवावी अशी मागणी मंत्रालय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रवी मंजुळे यांनी केली आहेत.
हेही वाचा -मुंबईत १११ म्यूकर मायकोसिसचे रुग्ण; बहुतांश रुग्ण मुंबई बाहेरील