महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

New Political Parties In Maharashtra : महाराष्ट्रात 15 नव्या राजकीय पक्षांचा उदय

लोकसभा, विधानसभांच्या निवडणुका पुढील वर्षी होणार असल्या तरी महाराष्ट्रात नवनवे राजकीय पक्ष उदयास येत आहेत. निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच महाराष्ट्रात 15 नवीन राजकीय पक्षांनी राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी करून आखाड्यात उतरण्याचे संकेत दिले आहेत. यामध्ये पुणे, नाशिक, जळगाव जिल्ह्यातील काही पक्षांचा समावेश असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

New Political Parties In Maharashtra
New Political Parties In Maharashtra

By

Published : May 13, 2023, 4:21 PM IST

Updated : May 14, 2023, 3:45 PM IST

मुंबई :राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्यापही लटकलेल्या अवस्थेतच आहेत. या निवडणुकांबाबत कोणताही ठोस निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, असे असले तरी नव्या राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी करून आपली राजकीय इच्छा प्रकट केली आहे.

महाराष्ट्रात 15 नव्या राजकीय पक्षांचा उदय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टांगणीला :राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या दीड वर्षांपासून सांगलीला लागलेल्या आहेत इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे त्यामुळे राज्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांसह छोट्या-मोठ्या पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या निवडणुकांकडे डोळे लावले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हा जाहीर होतील. याचा अद्यापही अंदाज येत नाही त्यामुळे सर्व प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्ष यांनी या निवडणुकां बाबतीत आस्ते कदम हे धोरण स्वीकारल आहे. मात्र, असं असलं तरी राज्यातील वेगवेगळ्या संघटना आणि आघाड्या यांनी पक्षांची नोंदणी करायला सुरुवात केली आहे.

कोणत्या पक्षांची झाली नोंदणी? :गेल्या चार महिन्यांच्या काळात राज्यात राज्य निवडणूक आयोगाकडे प्रजासत्ताक समाजवादी पार्टी, जनसामान्य पार्टी, अखिल भारतीय बंजारा सेना जळगाव, महाराष्ट्र जनविकास आघाडी, नाशिक जिल्हा लोकविकास आघाडी, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष इंदापूर पुणे यासह अन्य काही संघटनानी आपल्या राजकीय पक्षांची नोंदणी निवडणूक आयोगाकडे केली आहे, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.

काय आहे पक्ष नोंदणीची प्रक्रिया? :राज्यातील पक्ष नोंदणी करण्याची पद्धत अतिशय सोपी आणि सहज असल्यामुळे पक्षांची नोंदणी केली जात आहे. राजकीय पक्षाची नोंदणी करणाऱ्या पक्षाने सुमारे 150 सभासद, प्रस्तावित पक्षाची घटना निवडणूक आयोगाकडे सादर करायची असते. तसेच त्यासोबत दहा हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट जोडून अर्ज सादर करावा लागतो. अर्ज सादर केल्यानंतर अर्जासोबत च्या कागदपत्रांची छाननी आयोगाकडून करण्यात येते. त्यानंतर पक्ष नोंदणीची अधिसूचना जारी केली जाते. या अधिसूचनेवर एक महिन्याच्या आत जर कोणाच्या हरकती, तक्रारी आल्या नाही तर पक्षाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर नोंदणीकृत पक्षांना वर्षातून दोन वेळा लेखापरीक्षण आणि आपली माहिती निवडणूक आयोगाला सादर करावी लागते. ही माहिती सादर न केलेल्या पक्षांची नोंदणी आयोगाकडून रद्द केली जाते. आयोगाने 2016 मध्ये अशा पद्धतीने 220 पक्षांची नोंदणी रद्द केली होती, अशी माहितीही या अधिकाऱ्यांनी दिली.

राज्यात किती आहेत पक्ष? :सध्या राज्यात स्थानिक नोंदणीकृत पक्षांची संख्या 368 इतकी झाली आहे. राष्ट्रीय स्तरावरील पाच पक्ष आणि प्रादेशिक स्तरावरील तीन पक्षांची नोंदणी आहे. तर अन्य राज्यातील पक्षांची नोंदणी ही महाराष्ट्रात होत असून आतापर्यंत दहा पक्षांनी नोंदणी केली आहे. प्रत्येक वर्षी राजकीय पक्षांची नोंदणी आयोगाकडे होत असते. त्यानुसार 2018 मध्ये तेरा नव्या पक्षांची 2019 मध्ये पाच नव्या पक्षांची 2020 मध्ये सात नव्या पक्षांची 2021 मध्ये 35 नव्या पक्षांची नोंदणी झाली. मात्र, 2022 मध्ये सर्वाधिक 66 नव्या पक्षांची नोंदणी झाली, असून 2023 मध्ये आतापर्यंत 15 नव्या पक्षांची नोंदणी झाल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी दिली.

  • हेही वाचा -
  1. Karnataka Election Result 2023 : कर्नाटकात भाजप-काँग्रेसचा बहुमताचा दावा, 'जेडीएस'ची राहील कळीची भूमिका
  2. Karnataka Elections Results : कर्नाटक निवडणूक निकालावर मोठी भविष्यवाणी, वाचा कोण करणार सरकार स्थापन
  3. Sharad Pawar for MVA stronger : महाविकास आघाडी मजबुतीची शरद पवारांची हाक, अजित पवारांचा पुन्हा स्वप्नभंग
Last Updated : May 14, 2023, 3:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details