मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील राजकीय नेत्यांच्या बेकायदेशीरपणे फोन टॅपिंगप्रकरणी पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप करण्यात आला होता. तत्कालीन सरकारने त्रिसदस्यीय समितीची स्थापना करत समितीने दिलेल्या अहवालात रश्मी शुक्ला या दोषी आढळल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या अहवालाची शहानिशा केल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, रश्मी शुक्ला यांच्या विरोधातील गुन्ह्याचा तपास बंद करण्यात येत असल्याचा अहवाल (Closure Report) गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पोलिसांनी न्यायालयात केल्यानंतर शुक्ला यांना या प्रकरणात क्लीन चिट मिळाली. नंतर काही दिवसात रश्मी शुक्ला यांच्या रूपाने मुंबईला महिला पोलीस आयुक्त मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती.
हैद्रराबाद येथे होत्या कार्यरत : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचे नाव मुंबईच्या नव्या पोलीस आयुक्त म्हणून चर्चेत होते. रश्मी शुक्ला (१९८८) च्या बॅचच्या आयपीएस आधिकारी आहेत. रश्मी शुक्ला बढतीआधी हैदराबाद येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत होत्या. दरम्यान, रश्मी शुक्ला बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी सरकारने त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली होती. त्या समितीने दिलेल्या अहवालात रश्मी शुक्ला या दोषी आढळल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या अहवालाची शहानिशा केल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्यावर पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.